नगर: संकेत नवले हत्या प्रकरण, नवलेवाडीकरांचा पोलिस स्टेशनवर मशाल मोर्चा | पुढारी

नगर: संकेत नवले हत्या प्रकरण, नवलेवाडीकरांचा पोलिस स्टेशनवर मशाल मोर्चा

अकोले(नगर), पुढारी वृत्तसेवा : नवलेवाडी येथील संकेत नवले या तरुणाच्या हत्येला १३ दिवस होऊनही पोलिसांना तपास न लागल्याने पोलिस यंत्रणेच्या निषेधार्थ नवलेवाडीसह परिसरातील नागरिकांनी गुरुवारी सांयकाळी मशाल मोर्चा काढला. मोर्चेकरांनी ” इन्कलाब जिंदाबाद, संकेतच्या मारेकऱ्याचा शोध लागलाच पाहिजे, शासन झोकात मारेकरी मोकाट, संकेतच्या हत्येची चौकशी झालीच पाहिजे “अशा घोषणा देत तीव्र भावना व्यक्त केल्या.

अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील संकेत सुरेश नवले या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर नवलेवाडी ग्रामस्थानी बैठक घेऊन पोलिसांना दशक्रीया विधी होईपर्यंत तपासाला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संकेतचा दशक्रियाविधी होऊन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलीस यंत्रणेला हत्येप्रकरणी एक ही पुरावा हाती लागला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या तपासाविरोधात नवलेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभा घेऊन मशाल मोर्चाचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सायंकाळी नवलेवाडीतुन विशाल मशाल मोर्चा अकोले पोलिस स्टेशनवर काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला,पुरुष अबालवृद्ध व सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच हुतात्मा स्मारकापासुन सुरु झालेल्या हा मोर्चा पोलिस ठाण्यावर आल्यानंतर निषेध सभा घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,तहसीलदार सतिष थेटे निवेदन देण्यात आले.

Back to top button