नगर : नेवासा तालुक्यात सबकुछ गडाख ! | पुढारी

नगर : नेवासा तालुक्यात सबकुछ गडाख !

कैलास शिंदे  :

नेवासा : नेवासा तालुक्यातील तेराही ग्रामपंचायतींवर आमदार शंकरराव गडाख गटाने वर्चस्व प्राप्त केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंची पुरती पिछेहाट झाली. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गडाखच सबकुछ असल्याचे पुन्हा एखदा सिद्ध झाले आहे.  कांगोणीत माजी आ.मुरकुटे गटाचा गड आला पण सिंह गेल्याची परिस्थिती झाली आहे. भेंडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले गटाला चांगलीच चपराक बसली आहे. नवले गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले.
नेवासा तालुक्यातील सर्वच तेराही ग्रामपंचायतीवरआ. शंकरराव गडाख गटाचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यावर आपलाच वर्चचष्मा असल्याचे आ शंकरराव गडाख यांनी सिद्ध केले. अनेक गावातील सत्तेसाठी गडाखांच्याच दोन गटात लढती झाल्या. मात्र तरीही विरोधी मुरकुटे गटाचे पानीपत करत गडाखांनी सत्ता राखली. तेराही ग्रामपंचायतीचे सरपंच पद काबीज करत गडाखांनी माजी आ. मुरकुटे गटाचा पुरता धुव्वा उडविला.

माजी आ. मुरकुटे यांची सासुरवाडी असलेल्या कांगोणी गावात भाजपची सत्ता गडाख गटाने उलथून टाकली. मुरकुटे यांचे मेहुणे बंडू शिंदे यांनी सरपंच निवडून येण्यासाठी मोठी शक्ती लावली होती. परंतु आ. शंकरराव गडाख यांच्या गटाने विकास कामांच्या जोरावर सरपंच पदाची खुर्ची काबीज केली. रोहिणी कराळे या कांगोणीच्या सरपंच झाल्या. तेरा ग्रामपंचायती ताब्यात देत नेवासेकरांनी आ. गडाख यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविला.

माका, वडाळा बहिरोबा, भेंडा व माळीचिंचोरा गावातील लढती लक्षवेधी झाल्याचे निकालावरून दिसून आले. भेंड्यात वर्षा नवले तर वडाळ्यात ललित मोटे हे सरपंच पदी निवडून आले. माका येथील सरपंचपद विजया पटेकर यांनी पटकाविले. गोधेगावात बेबी जालिंदर नरोडे यांची सरपंचपदी निवड झाली तसेच सर्वाधिक सदस्यही गडाख गटाचे विजयी झाले. सुरेशनगरच्या सरपंच शैला कल्याण उभेदळ या बिनविरोध निवडून आल्या आहेत. हंडी निमगाव येथे अत्यंत अटीतटीच्या लढतीत आ. शंकराव गडाख यांना मानणार्‍या पूजा भिवाजी आघाव या सरपंच झाल्या. शिरेगाव येथे आ. शंकरराव गडाख समर्थक निरंजन द्वारकानाथ तुवर हे बिनविरोध सरपंच झाले.

खूपटी येथेही गडाखांचे वर्चस्व पाहावयास मिळाले. तेथे दत्तात्रय वरुडे हे बिनविरोध सरपंच पदी निवडून आले. चिंचबन येथे मीनाक्षी गोरक्षनाथ काकडे या बिनविरोध सरपंच पदी निवडून आल्या. हिंगोणी येथे रूपाली ज्ञानेश्वर खंडागळे याही बिनविरोध सरपंच झाल्या. माळीचिंचोरा येथे गडाख यांना मानणारे राजेंद्र देवराव अहिरे हे अवघ्या नऊ मतांनी सरपंच पदी निवडून आले. अंमळनेर येथे ज्ञानेश्वर काशिनाथ आयनर हे सरपंच पदी निवडून आले. नेवासा तालुक्यावर आ. गडाख यांचाच वर्चस्व असल्याने नेवासेकरांनी मतपेटीतून दाखवून दिले. मुरकुटे गटाला पुन्हा एकदा नेवासेकरांनी नाकारल्याचे निकालातून समोर आले.

Back to top button