कोपरगाव स्मशानभूमीतच जुळल्या रेशीमगाठी..! | पुढारी

कोपरगाव स्मशानभूमीतच जुळल्या रेशीमगाठी..!

कोपरगाव : महेश जोशी : स्थळ कोपरगाव येथील बाजारतळानजीक गोदावरी नदीजवळ असलेली स्मशानभूमी… अमरधाम.. त्या अमरधामात उभारण्यात आलेला भव्य लग्न सभामंडप…. तेथील घरावरील विद्युत रोषणाई… वऱ्हाडी मंडळींची गर्दी… सोबतीला वाजंत्री…. आतषबाजी… मंगलाष्टकं अन् जेवणाच्या पंगती… कोपरगावातील अमरधाममध्ये हे चित्र पाहायला मिळाले.

स्मशान जोगी समाजाच्या शिवराम व राधाबाई जाधव यांनी त्यांच्या पल्लवी नावाच्या कन्येचा विवाह स्मशानभूमीतच थाटामाटाने लावून दिला. यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याची जिल्ह्यातून चांगलीच चर्चा झाली अन् कौतुकरूपी अक्षतांचाही वर्षाव झाला. विशेष म्हणजे लग्नाचा सर्व खर्च नवरदेवाने केल्याचे राधाबाई जाधव यांनी सांगितले.

नदीकाठी पालिकाअंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची गेल्या २२ वर्षांपासून देखभाल करण्याची जबाबदारी शिवराम जाधव व राधाबाई जाधव या दाम्पत्यावर आहे. तुटपुंज्या मानधनावर ही जबाबदारी हे दाम्पत्य पेलत आहे. त्यांची कन्या पल्लवी हिचा विवाह तेलंगणातील मुलगा रमेश मलप्पा कडमंचे याच्याशी जुळला. आई-वडील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे काम करतात. त्यांची कन्या पल्लवीच्या रेशीमगाठी सनई चौघड्याच्या निनादात मंगल कार्यालयात पार पडतील, अशी आशा होती. परंतु, प्रत्यक्षात शिवराम जाधव यांनी स्मशानभूमीलाच मंगल कार्यालय बनविले. त्यांनी कन्या पल्लवीच्या विवाह सोहळ्याचा बार थेट स्मशानभूमीत उडवून दिला. वऱ्हाडी मंडळींचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. इतरांच्या विवाहात होणारी सारी हौस-मौज शिवराम जाधव यांनी लेकीच्या विवाहात पूर्ण केली. स्मशानभूमीत लग्नाचा मंडप सजविला, वरातीत आतषबाजी केली. आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींना तेथेच भोजन मेजवानीही दिली.
ज्या स्मशानभूमीत हे दाम्पत्य काम करते, तेथेच त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा बार उडवून देत नवविवाहित जोडप्याच्या सोनेरी आयुष्याची सुरुवात करून दिली.

Back to top button