राहुरी : दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले | पुढारी

राहुरी : दुचाकीस्वारांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र धूम स्टाईलने ओरबाडून धूम ठोकल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी शहर हद्दीत घडली. या घटनेतील वैशाली उत्कर्ष मुळे (रा. जुने पाठक हॉस्पिटल, अहमदनगर) आणि कुलदीप चंद्रकांत जोशी हे आज सकाळी मोटरसायकलवर राहाता तालूक्यातील अस्तगाव येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते मोटरसायकलवर राहुरी मार्गे अहमदनगरकडे जात होते.

दुपारी पावणे दोन वाजेदरम्यान राहुरी शहर हद्दीतील नगर- मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पाठीमागून मोटरसायकलवर दोन भामटे येत होते. दोघांपैकी मोटरसायकलवर मागे बसलेल्या भामट्याने चालू गाडीवर वैशाली मुळे यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सुमारे दोन लाख रूपये किंमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र ओरबडून घेत स्टेशन रोडने सुसाट वेगात धूम ठोकली. वैशाली मुळे व कुलदीप जोशी यांनी त्या भामट्यांचा पाच नंबर नाका, स्टेशन रोड ते शनीचौक पर्यंत मोटरसायकलवर पाठलाग केला. परंतू शनीचौकातून ते दिसेनासे झाले. घटनेनंतर वैशाली मुळे यांनी पोलिसात तक्रार दिली.

Back to top button