नगर तालुक्यात पाळीव जनावरे चोरीचे सत्र सुरूच | पुढारी

नगर तालुक्यात पाळीव जनावरे चोरीचे सत्र सुरूच

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात शेतकर्‍यांच्या गावरान तसेच जर्सी गायी, खिलार बैल, शेळ्या, मेंढ्या, बोकड इत्यादी पाळीव जनावरे चोरीला जाण्याचे गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू झालेले सत्र अद्यापही चालूच आहे. दर आठवड्यात कोणत्या ना कोणत्या गावातून शेतकर्‍यांची जनावरे चोरीला जात आहेत. या जनावरे टोळ्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.  नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारोळा कासार व खंडाळा या गावांच्या शिवारातून 3 शेतकर्‍यांच्या 6 शेळ्या गेल्या 2 दिवसांत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामध्ये सारोळा कासारच्या आमराई मळा परिसरातून नामदेव एकनाथ कडूस यांच्या घराशेजारील गोठ्यातून गुरुवारी (दि.24) पहाटे 2 च्या सुमारास 2 शेळ्या व तेथून जवळच असलेल्या काळे मळा येथून नामदेव नाथा काळे यांच्या गोठ्यातून 1 शेळी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.25) पहाटे खंडाळा गावच्या शिवारातशोभा सुभाष कार्ले यांच्या घराशेजारील गोठ्यातून 3 शेळ्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत कार्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात दहिगाव परिसरातून शेतकर्‍यांच्या चार पाच शेळ्या चोरीला गेल्या. मात्र, याबाबत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. तालुक्यातील अनेक गावात पाळीव जनावरे, कोंबड्या चोरीचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत.

Back to top button