दोन महिन्यांत 300 कोटींचा कर जमा; पावणेतीन लाख मालमत्ताधारकांनी भरला कर

दोन महिन्यांत 300 कोटींचा कर जमा; पावणेतीन लाख मालमत्ताधारकांनी भरला कर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन विभागाकडे अवघ्या 60 दिवसांत 308 कोटींचा मालमत्ताकर जमा झाला आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेत 2 लाख 71 हजार 503 मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला आहे. सवलत 30 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

शहरातील 6 लाख 30 हजार मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. कर संकलन विभागाने घरोघरी मालमत्ताकराची बिले वाटली आहेत; तसेच वसुली मोहीम सक्तीने राबविण्यात आली होती. त्यामुळे मालमत्ताधारकांनी रांगा लावून मालमत्ताकर भरला. एकूण 2 लाख 71 हजार 503 मालमत्ताधारकांनी 308 कोटी 42 लाख 31 हजार रुपयांचा कर जमा केला आहे. यामध्ये 2 लाख 39 हजार 40 निवासी मिळकती आहेत. 20 हजार 799 बिगर निवासी, 6 हजार 88 मिश्र, 1 हजार 972 औद्योगिक तर, 1661 मोकळ्या जमीन असणार्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे, असे कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

वाकड झोनमधून सर्वाधिक प्रतिसाद कर संकलन विभागाच्या शहरातील 17 झोनमधील वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 759 नागरिकांनी बिलाचा भरणा केला आहे. सांगवीमध्ये 29 हजार 382, चिंचवडमध्ये 24 हजार 124, थेरगावमध्ये 24 हजार 727, पिंपरी गावामध्ये 18 हजार 529 मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. सर्वात कमी पिंपरी कॅम्प झोनमध्ये केवळ 3 हजार 19 जणांनी कर भरला आहे.

असा झाला भरणा

  • ऑनलाइन – 218 कोटी 29 लाख
  • रोख – 19 कोटी 32 लाख
  • धनादेश – 12 कोटी 81 लाख
  • एनईएफटी – 9 कोटी 21 लाख
  • विविध अ‍ॅप – 8 कोटी 48 लाख
  • ईएडीसी – 1 कोटी 71 लाख
  • आरटीजीएस – 1 कोटी 72 लाख
  • डीडी – 70 लाख 85 हजार

सवलतीचा लाभ घ्या

महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांना 31 मे रोजी पूर्वी कर भरण्याचे आवाहन 'एसएमएस'द्वारे करण्यात आले होते. 30 जूनपर्यंत सवलत लागू असून नागरिकांनी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट न बघता, रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची वेळ येऊ देवू नये, यासाठी योजनांचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

तीन महिन्यांत पाचशे कोटींचे टार्गेट

गतवर्षी पहिल्या तिमाहीत 450 कोटी रुपयांचा भरणा झाला होता. यामध्ये 35 कोटी उपयोगकर्ता शुल्काचे होते. यंदा दोन महिन्यात 308 कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. कर संकलन विभागाने पहिल्या तिमाहीत 500 कोटींचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

ऑनलाइनने सर्वाधिक भरणा

ऑनलाइन मालमत्ताकर भरणार्यांना 5 टक्के सवलत देण्यात येते. पहिल्या दोन महिन्यात 1 लाख 99 हजार 807 नागरिकांनी सर्वाधिक 218 कोटी 29 लाख 29 हजार रूपयांचा ऑनलाइन कराचा भरणा केला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news