नेवासा : सर्वसामान्यांचे प्रश्न कार्यकर्त्यांनी सोडवावेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

नेवासा : सर्वसामान्यांचे प्रश्न कार्यकर्त्यांनी सोडवावेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री शिंदेंची शिर्डीत भेट घेतली. दरम्यान शिवसेनेच्या संघटन वाढीबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न झपाट्याने मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.23) रोजी शिर्डी येथे सपत्निक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेवासा तालुकाप्रमुख सुरेशराव डिके, तालुका उपप्रमुख गोरख गायकवाड, नेवासा शहरप्रमुख बाबा कांगुणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा उपप्रमुख भगवान गंगावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सत्कार केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिर्डी येथे शिवसेना पदाधिकार्‍यांकडून संघटनात्मक कामाचा आढावा घेऊन झपाट्याने कामाला लागण्याचा आदेश दिला. यावेळी झालेल्या चर्चेत पदाधिकार्‍यांनी संघटनात्मक घडामोडींवर मुख्यमंञ्यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या मनात रुचलेला असून तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर पदाधिकार्‍यांनी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन कार्यकर्त्यांना संघटनावाढीसाठी येणार्‍या अडचणींना वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी दिल्याचे तालुकाप्रमुख सुरेशराव डिके यांनी ही माहिती देताना सांगितले. याप्रसंगी तालुका पदाधिकारी बापूसाहेब दारकुंडे, अंबादास रोडे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर यावेळी उपस्थित होते.

Back to top button