नेवासा : महाविद्यालयात राडा ! प्राध्यापक, सुरक्षा रक्षकाला मारहाण | पुढारी

नेवासा : महाविद्यालयात राडा ! प्राध्यापक, सुरक्षा रक्षकाला मारहाण

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  महाविद्यालयातील मुलीशी बोलत असताना तिला याबाबत हटकणार्‍या प्राध्यापकाच्या तोंडात मारून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करत डोक्यात बांबू घालून मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून महाविद्यालयात चांगलाच राडा झाला. याप्रकरणी एका विद्यार्थ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयात बुधवारी (दि.16) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. यावेळी झालेल्या जबर मारहाणीत सुरक्षा रक्षक पाराजी तागड (रा.सोनई, ता.नेवासा) गंभीर जखमी झाला आहे. त्यांना नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत प्रा. दशरथ आयनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाविद्यालयातील विशाल संजय साठे (रा.काळेगाव, मुकिंदपूर, ता.नेवासा) याच्यासह अन्य पाच जणांवर बुधवारी रात्री उशिरा नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या प्रकरणावरून महाविद्यालयात चक्क प्राध्यापकासह सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याने या राड्याची जोरदार चर्चा तालुक्यात पसरली आहे. प्रा. दशरथ आयनर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.16) दुपारी पावणेचारच्या सुमारास महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुलांची गर्दी जमल्याने प्रा.दशरथ आयनर आणि सुरक्षा रक्षक पाराजी तागड तेथे आले.

त्यावेळी नेवासा रोड-नेवासा फाटा रस्त्याच्या पलिकडे महाविद्यालयाचा विद्यार्थी विशाल साठे याच्यासह 20 ते 25 वर्षे वयाची पाच ते सहा मुले उभी होती. त्यातील निखिल (पूर्ण नाव माहीत नाही) नावाचा मुलगा प्रवेशद्वाराजवळ आला व सुरक्षा रक्षक तागड यांना म्हणाला की, ‘लई माजलास कारे, तुझ्या कॉलेजच्या मुलीला मी बोलत असताना तिला तू का हटकले? तुझ्याकडे बघतोच’, अशी धमकी देत तागड यांची गचांडी धरून धक्काबुक्की केली. यावेळी प्रा.आयनर यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही या मुलांनी धक्काबुक्की करून तोंडावर फटका मारला.

यावेळी तेथे असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थी अनिल बबन माळी व अंकुश अशोक शिंदे यांनाही त्या मुलांनी शिवीगाळ करत बाजूला ढकलून दिले. सुरक्षा रक्षक तागड यांना धक्काबुक्की सुरू असताना अचानक एकाने जाड बांबू त्यांच्या डोक्यात कानाजवळ मारल्याने ते जागेवर बेशुद्ध पडले. जखमी तागड यांना विद्यार्थी अनिल माळी (रा.अंमळनेर), निखिल सावंत (रा.नेवासा खुर्द), संदीप भुजबळ (रा.भेंडा) यांनी रिक्षात टाकून नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास नेवासा पोलिस ठाण्याचे निरिक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

Back to top button