नगर : चोरट्यांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद; सोलार पंप, टेम्पोची चोरी | पुढारी

नगर : चोरट्यांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद; सोलार पंप, टेम्पोची चोरी

नगर; पुढारी वृत्तसेवा : एमआयडीसीत एकाच रात्री एका कंपनीतून सोलार मोटार पंप व साहित्य तसेच मालवाहतूक टेम्पोची चोरी करणार्‍या सराईत आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. आरोपींकडून टेम्पो व सोलार पंप व साहित्य असा सहा लाख 36 हजार 643 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शुभम महादेव खोत (वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. औरंगाबाद, हल्ली रा. वनराई कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर) अक्षय बंडू कुर्‍हाडे (वय 24, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि.औरंगाबाद, हल्ली रा. वैदुवाडी, भिस्तबाग, सावेडी, अहमदनगर) राहुल भाऊसाहेब नेटके (वय 20, रा. देवगाव, ता. नेवासा, हल्ली रा. मनोरमा कॉलनी, नागापूर, एमआयडीसी, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि.8 नोव्हेंबर रोजी विजय पोपट घोरपडे यांच्या मालकीचा मालवाहतूक करणारा टेम्पो व विजयसिंग गुरदिपसिंग सॅम्बी यांच्या कंपनीतील सोलार मोटार पंप व साहित्य असा सात लाख 45 हजार 24 रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, आरोपी शुभम खोत हा साथीदारांसह चोरीच्या टेम्पोमध्ये कंपनीतील चोरीचा माल नगर-औरंगाबाद रोडने घेऊन जात आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेऊर गावच्या शिवारातून टेम्पो अडवून ताब्यात घेतला. पोलिसांनी अटकेतील आरोपींना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

या पथकाने केली कारवाई
पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार मनोहर शेजवळ, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, शंकर चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपी खोतवर चार गुन्हे
अटकेतील आरोपी शुभम महादेव खोत याच्यावर एमआयडीसी वांळुज पोलिस ठाणे (औरंगाबाद), सातारा पोलिस ठाणे (औरंगाबाद), करमाड (जालना), अंबड (जालना) या पोलिस ठाण्यात जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत.

Back to top button