नगर शहरात दीडशे रस्त्यांची कामे होणार; टिळक रोड होणार ‘मॉडेल’ | पुढारी

नगर शहरात दीडशे रस्त्यांची कामे होणार; टिळक रोड होणार ‘मॉडेल’

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील 150 रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सध्या सुमारे दहा ते पंधरा रस्त्यांची कामे सुरू आहेत. आगामी पंधरा वर्षांचा विचार करून टिळक रोडचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. रस्ता काँक्रिटीकरणासाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक मशिन नगरमध्ये आले आहे, अशी माहिती प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी दिली.

आमदार संग्राम जगताप यांनी शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून पाच कोटींचा निधी मंजूर करून आणाला आहे. त्या निधीतून कै. गंगाधर शास्री गुणे चौक व कै.हिराबाई भापकर पुतळा ते वाडिया पार्क या रस्त्याचे काँक्रिटीकरण व साईड गटरचे काम हाती घेतले आहे. 18 मीटर रुंदी व 650 मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सुरुवातीला या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले.

दोन्ही बाजूने गटर व पाण्याच्या लाईनची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर पहिल्यांदा 3 ते 4 फूट रस्ता खोदाई करण्यात आली. त्यावर खडीकरण करून दबाई करण्यात आली आणि काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. दोन्ही बाजूने साडेपाच मीटर रस्ता एम-30 गे्रड दर्जाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.

भविष्यात रस्ता खोदला जाऊ नये, त्यासाठी ठराविक अंतरावर रस्त्याच्या खालून आरसीसी पाईप टाकून क्रॉसिंग करून ठेवलेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार (केम्बरिंग) ठेवण्यात आला आहे. जेणे करून रस्त्यावर पाणी साचणार नाही. या कामाच्या दर्जावर अभियंता श्रीकांत निंबाळकर हे लक्ष ठेवून आहेत.

रस्त्यांसाठी 37 कोटींचा निधी
शासनाच्या मूलभूत विकास योजनेतून 37 कोटी रूपयांचा निधी रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे. त्यातून शहरातील एमएसईबी ते कोंबडीवाला मळा, काटवन खंडोबा ते खोकर नाला, महात्मा फुले चौक ते भिंगार नाला पूल व अन्य एक रस्ता या निधीतून केला जाणार आहे. त्यातील एक रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.

Back to top button