बँकेच्या ताब्यातून ‘तनपुरे’ सोडवावा ; प्रा. राऊत यांचे देवळालीतील पत्रकार परिषदेत आवाहन | पुढारी

बँकेच्या ताब्यातून ‘तनपुरे’ सोडवावा ; प्रा. राऊत यांचे देवळालीतील पत्रकार परिषदेत आवाहन

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याची कामधेनू डॉ. तनपुरे साखर कारखाना जिल्हा बँकेने ताब्यात घेऊन एका युगाची हत्या केली आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधिल असलेली जिल्हा बँक ही तनपुरे कारखान्यावर 15 टक्के व्याज आकारत आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्याची मालमत्ता विकून जिल्हा बँकेच्या सावकारी पाशातून कारखाना मुक्त करून कारखान्याची चाके फिरवा, अशी मागणी देवळाली प्रवरा येथील प्राध्यापक सतीश राऊत यांनी केली आहे.

राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गवरील हॉटेल साई-समाधान येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रा.राऊत बोलत होते. यावेळी तनपुरे कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे, सुनील विश्वासराव, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे आदी उपस्थित होते. प्रा. राऊत म्हणाले की, 44 कोटींच्या कर्जावर 70 कोटी रुपये व्याज वसूल केले. 112 कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कार्यालयीन कर्मचार्‍यांना बाहेर काढून दिमागदारपणे ‘गेटला’ कुलूप लावले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज संपविला गेला आहे.

100 वर्षांपूर्वी सावकारीच्या जुलमातून शेतकर्‍यांना मुक्त करण्यासाठी सहकाराला जोपासणी दिली. परंतु दुर्दैवाने ज्या सावकार शाहीपासून शेतकर्‍यांची सुटका करण्यासाठी जिल्हा सहकारी बँका स्थापल्या गेल्या त्याच बँकेच्या माध्यमातून राहूरीचा गळा घोटला गेला.44 कोटींचे कर्जावर 70 कोटी व्याज भरून सुद्धा 112 कोटी थकबाकी टाकून तनपुरे कारखाना संपविण्यात आला. आज अनेक खासगी बँका कॅश क्रेडिटवर 6 टक्के ते 9 टक्के व्याज आकारत असताना शेतकर्‍यांच्या हितासाठी बांधील असलेली अहमदनगर जिल्हा बँक राहुरीवर 15 टक्के व्याज लावत आहे.

Back to top button