शेवगाव : खराब रस्त्यांमुळे भाऊबिजेला येणार्‍या बहिणींची माहेरची वाट बिकट | पुढारी

शेवगाव : खराब रस्त्यांमुळे भाऊबिजेला येणार्‍या बहिणींची माहेरची वाट बिकट

रमेश चौधरी : 

शेवगाव : भाऊबिजेला बहिणीला माहेरची वाट बिकट बनली असून, खराब रस्त्यांचा थेट नात्यावर परिणाम झाला. माहेरपणाला रस्त्यांनी गालबोट लावले आहे. हा मानसिक आघात झाल्याने यास दोषी असणार्‍यांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे दरवर्षी भाऊबिजेला नित्यनेमाने येणार्‍या बहिणींची माहेरची वाट बिकट झाली आहे. एरवी नातेसंबंधात अडसर ठरणार्‍या कौटुंबिक मालमत्तेच्या, शेतजमिनींच्या वादात यंदा खराब रस्त्यांची भर पडली. त्यामुळे बहीण-भावाच्या नात्यात दुरावा निर्माण करणारे खड्डेयुक्त खराब रस्ते वाहनचालकांबरोबर नात्यांची ही परीक्षा पाहू लागले आहेत. यंदा दिवाळीत सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या टीकेचे लक्ष्य बनले.

शेवगाव तालुका हद्दीतून जाणार्‍या पैठण, नेवासा, गेवराई, तिसगाव, पांढरीपूल, कोरडगाव या प्रमुख मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रचंड लहानमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते वाहनचालक व नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी जीवघेणे ठरत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार्‍यांचेे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अंतर्गत व प्रमख रस्त्यांच्या दुरवस्थेचा थेट परिणाम ग्रामीण अर्थकारणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे.

रस्त्यावरील दैनंदिन कसरतीमुळे अनेकजण शारीरिक व्याधींनी जखडले. रोजच्या आदळ आपटीने चारचाकी, दुचाकी वाहने भंगारात निघाली आहेत. तालुक्यातील एकही रस्ता प्रवासालायक राहिला नसल्याने कुठून कुठे जावे हा प्रश्न नागरिकांना सतत सतावत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्ते फक्त माती, मुरूम आणि कोरड्या खडीवर तग धरून आहेत.

यंदा मात्र या खड्ड्यांतील रस्त्यांचा थेट नात्यावर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर भाऊ-बहिंणीच्या नात्यांची गोडी वाढविणारे भाऊबीजेचे पर्व सुरू झाले आहे. बहिणीला भावाकडे जाण्याची ओढ, तर भावाला बहीण येण्याची आतुरता यंदा मात्र रस्त्याच्या संकटात बदलली आहे. रोजच्या कौटुंबिक धावपळीत आणि संसाराच्या रामरगाड्यात आधीच बिकट असलेली माहेरची वाट यंदा खराब रस्त्यामुळे बहिणीसाठी अधिकच बिकट बनली.

भाऊबिजेची ऑनलाईन ओवाळणी
प्रत्यक्ष भेटीगाठीची आतुरता रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे हिरावली आहे. बहीण फोनवरून भावाला तुमच्याकडचे रस्ते फार खराब आहेत. मी नंतर कधीतरी येईल, असे सांगत भाऊबिजेची ऑनलाईन ओवाळणी करत आहे. एरवी कौटुंबिक मालमत्तेचे, शेतजमिनीचे, सोयरिकीचे वाद हे बहीण भावातील नात्यात अडसर ठरलेले अनुभवले आहे.

नागरिकांमधून संताप व चीड व्यक्त
तालुक्यातील खराब रस्त्याची या नात्यात दुरावा निर्माण करण्यासाठी भर पडली आहे. खराब रस्त्याच्या कारणाने अनेक बहिणी भाऊबिजेला भावाकडे आल्याच नाहीत. वर्षातून एकदा येणार्‍या लेकीबाळीच्या हक्काच्या माहेरपणाला खराब रस्त्यानी गालबोट लावले.
त्यामुळे त्यास जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत तालुक्यातून संताप व चीड व्यक्त होत आहे.

Back to top button