नगर : ऑक्टोबर अतिवृष्टी नुकसानीपोटी चारशे कोटीचा प्रस्ताव; आतापर्यंत सव्वा चार कोटी मिळाले | पुढारी

नगर : ऑक्टोबर अतिवृष्टी नुकसानीपोटी चारशे कोटीचा प्रस्ताव; आतापर्यंत सव्वा चार कोटी मिळाले

दीपक ओहोळ : 

नगर : ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने कहर केला. अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख 56 हजार 601 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ऑक्टोबरच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातील 4 लाख 33 हजार शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी चारशे कोटी मिळावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनदरबारी धाडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 56 हजार 601 हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

त्याच्या नुकसानीपोटी चारशे ते सव्वाचारशे कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. ऑक्टोबरमधील नुकसानग्रस्त 4 लाख 33 हजार 643 बाधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. यंदा जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यात 1 हजार 319.5 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका 21 हजार 410 बाधित शेतकर्‍यांना बसला. शिंदे-फडणवीस सरकारने 22 ऑगस्ट 2022 रोजी अध्यादेश काढत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांतील नुकसान वाटपासाठी 4 कोटी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यातील 4 कोटी 8 लाख 91 हजार रुपयांचा निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमाही झाला आहे.

सप्टेंबरचा अहवाल गेला, निधीकडे लागले लक्ष
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे एकंदरीत 1 लाख 35 हजार 357 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकर्‍यांना दुपटीने नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 287 कोटींचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. मात्र अजूनपर्यंत हा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. आता शासनाकडून सप्टेंबर व ऑक्टोबरची एकत्रित मागणी पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑक्टोबरचे तालुकानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
नगर 22532, नेवासा 36750, श्रीगोंदा 23850, पारनेर 27866, पाथर्डी 38500, शेवगाव 56122, संगमनेर 2405, अकोले 2500, राहुरी 1500, कर्जत 32500, जामखेड 13900, राहाता 8476.

Back to top button