लाखो रुपये गेले कुठे; बडे मासे पाण्यातच! | पुढारी

लाखो रुपये गेले कुठे; बडे मासे पाण्यातच!

कैलास शिंदे : 

नेवासा : कृषी विभागाच्या खासगी दलालांनी पैसे मागितल्याच्या आरोपाचा अखेर बॉम्ब फुटला. यातील दोषी निलंबित झाले; मात्र पैसे मागण्याचा कानमंत्र देणार्‍या पडद्या मागच्या अधिकार्‍यांचे काय? लाखो रुपये उकळले ते कुठे गेले, याचा तपासही लागणे महत्वाचे असल्याची चर्चा आता शेतकर्‍यांमधून दबक्या आवाजात होताना दिसत आहे. पीक नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी एकरी चारशे रुपये पैशांची मागणी करणारी अ‍ॅडिओ क्लीप व्हायरलनंतर समाज माध्यमात व्हीडीओ बॉम्बने नेवासा तालुक्यासह राज्यात खळबळ उडवून दिली. शेतकर्‍यांच्या पिकांची पावसामुळे नासाडी झाली. बळीराजा संकटात सापडला. लाखो रुपयांचा खर्च वाया जावून नुकसानीच्या पंचनाम्यासाठी एकरी चारशे रुपये शेतकर्‍यांकडून उकळण्यात आले. लाखो रुपये उकळल्यानंतर अ‍ॅडिओ आणि व्हीडिओ बॉम्बमुळे कृषी विभागाचा कारभार समोर आला.

दलालांनी वसूल केलेल्या शेतकर्‍यांच्या पैशांची चौकशी करून संबंधित कृषी विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दुख: म्हतारी मेल्याचे नसून काळ सोकवायला नको, याचे आहे. अधिकार्‍यांपेक्षा जबाबदार राज्यकर्त्यांनी ही खबरदारी घेणे काळजी गरज आहे.

कृषी विभागाच्या चाणक्ष अधिकार्‍यांनी एकरी चारशे रुपये पंचनामा करण्यासाठी मागणी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनाम्याचे काम तातडीने उरकण्यात यावे म्हणूनच हा बहाणा आखून खासगी दलालांची नेमणूक करून भोळ्या-भाबड्या शेतकर्‍यांकडून लाखो रुपये उकळल्याची परिसरात चर्चा होती. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून एकरी चारशे रुपये उकळल्याची चर्चा समाजमाध्यमात सुरू झाली. पैसे उकळल्यानंतर अखेर याचा भांडाफोड झाल्यानंतर तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले.

मात्र बडे तथा वरिष्ठ अधिकारी नामानिराळे राहिल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांना दलालांनी कनिष्ठ कर्मचार्‍यांचे नांव सांगून पैसे मागितले; मात्र त्याच्या पडद्या आडून कोणाच्या तोंडीबोलीमुळे ही वसूली सर्रास सुरू होती. याचा शोध घेणेही तितकेच गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांमधून बोलेल जात आहे. अनेक शेतकर्‍यांकडून खासगी दलाल पैसे उकळून रिकामे झाले. त्यांच्यावर आता कोण कारवाई करणार? असा सवालही यानिमित्ताने समोर येत आहे.

पंचनाम्याच्या निमित्ताने आलेल्या दलालांनी फोन पे सारख्या ऑनलाईन माध्यमातूनही पैसे टाका, असे म्हणत शेतकर्‍यांना गंडा घातला, तर अनेक शेतकर्‍यांकडूनही प्रत्यक्षात पैसे घेतल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘धरला तो चोर’ झाला खरा, मात्र पैसे मागण्याचा पडद्या आडून कानमंत्र देणारा म्होरक्या अलगद सुटण्याचा अधिक धोका नाकारता येत नाही. यामुळे याप्रकरणाची कसून चौकशी होण्याची नितांत गरज आहे.

चौकशीअंती पुढची कारवाई करू : डमाळे
नेवासा तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यासाठी एकरी चारशे रुपयांची मागणी कर्मचार्‍यांसह दलालांनी केली होती. अ‍ॅडिओ बॉम्बने खळबळ उडवून दिली. अनेकांनाकडून पैसेही उकळण्यात आलेले असून, काहींनी फोन पेवरून पैसे दिल्याचे बोलले जातेय. याबाबत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, केवळ पैसे घेतल्याची चर्चा आहे; मात्र कोणी पैसे दिले याची सविस्तर माहिती आणि पुरावे सादर केल्यास कारवाई केली जाईल. तीन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. पैसे घेतल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्यास पुढची कारवाई करू, असे कृषी अधिकारी डमाळे यांनी सांगितले.

अन्यथा रस्त्यावर उतरू
तालुक्यातील अनेक एकरचे पंचनामे झाले असताना संकटात सापडलेल्या बळीराजांकडून पैसे उकळलेल्या कृषी विभागाच्या खासगी दलालांसह त्याच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नसल्याचेही शेतकरी सांगत आहेत.

कृषी विभागाच्या कारभाराचे खरे रुप
अडचणीत सापडलेल्या बळीराजाच्या नुकसानीच्या पंचनाम्यावरून समोर आलेले असून, वरून कीर्तन आणि आतून तमाशा करणार्‍या कृषी विभागाच्या दोषी अधिकार्‍यांचा छडा लावून चौकशीअंती त्यांना योग्य कारवाई होणे ही काळाची गरज आहेे. अन्यथा या प्रकारणाची यथावकाश किंमत बळीराजा दाखवून दिल्या शिवाय राहणार नसल्याचे मतही जाणकारांसह शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे.

Back to top button