नगराध्यक्षांवर आज अविश्वास? श्रीगोंदा नगरपालिकेत राजकीय भूकंपाचे संकेत | पुढारी

नगराध्यक्षांवर आज अविश्वास? श्रीगोंदा नगरपालिकेत राजकीय भूकंपाचे संकेत

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, हा अविश्वास ठराव आज गुरुवार दि. 3 रोजी दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. नगराध्यक्षा शुभांगी पोटे व त्यांचे पती मनोहर पोटे हे नगरपालिका कारभारात सत्ताधारी नगरसेवकासह विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका राजकीय वर्तुळात धुसफूस सुरू आहे. सुरुवातीला गणेश भोस यांनी पुढाकार घेऊन गटनेते मनोहर पोटे यांना गटनेते पदावरून हटवत पोटे यांना पहिला चेकमेट दिला.

गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात नगरसेवकांची कामे ठळकपणे दिसली नाहीत. त्यात नगरसेवकामध्ये पोटे यांच्याविषयी नाराजी वाढतच गेली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकानी एकत्र येऊन पोटे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बैठक घेतली. त्या बैठकीत अंतिम निर्णय झाला नव्हता. आता मात्र आज गुरुवारी 3 नोव्हेंबरला हा अविश्वास ठराव दाखल करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत नगरसेवकांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. याबाबत माध्यमांना माहिती न देण्याच्या सूचना नेत्यांनी दिल्या असल्याचे समजते.

आमदार पाचपुते गटाशी हातमिळवणी
पोटे यांच्यावर नेतेही नाराज असल्याने त्यांनीही अविश्वास ठरावाला हिरवा कंदील दाखवला आहे. हा अविश्वास ठराव संमत करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाशी हातमिळवणी केल्याचे दिसून येते.

सोळा नगरसेवक करणार अविश्वास
नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सोळा नगरसेवकांनी संमती दर्शवली असल्याचे समजते. आज गुरुवारी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीला अलिप्त ठेवलंय!
नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या हालचालीबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अलिप्त ठेवण्यात आले आहे. अर्थात हे नगरसेवक मनोहर पोटे यांचे कट्टर समर्थक असल्यानेच त्यांना अलिप्त ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

Back to top button