राहुरी : गुहामधील दोघा तरुणांवर विळ्याने प्राणघातक हल्ला | पुढारी

राहुरी : गुहामधील दोघा तरुणांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: मोटरसायकलवरून जात असताना कट मारल्याचा जाब विचारला म्हणून दोघा जणांवर धारदार विळ्याने प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील गुहा परिसरात घडली. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

विकास धोंडीराम सौदागर व त्याचा चूलत भाऊ रमेश अशोक सौदागर हे दोघेजण त्यांच्या दुचाकीवरून किरणा सामान आणण्यासाठी गुहा येथील बसस्थानक पासून जात होते. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे त्याच्या दुचाकीवरून जोरात आला. त्याने विकास सौदागर यांच्या दुचाकीला कट मारला. त्यावेळी विकास सौदागर हा त्यास म्हणाला की, ‘तू आम्हाला कट का मारला’ असे विचारल्याचा राग आल्याने त्याने विकास सौदागर याला शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. रमेश सौदागर हा भांडण सोडवीण्यासाठी आला असता आरोपी म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या नादी लागता काय? गावात कोणीच माझ्या नादी लागत नाही. आज तूम्हाला कायमचा संपवून टाकतो’. असे म्हणून त्याने धारदार दातरे असलेल्या विळ्याने रमेश सौदागर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला. त्याच्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर विकास सौदागर याच्यावर देखील वार करून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर सौदागर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. विकास धोंडीराम सौदागर (वय 24, रा. गुहा, ता. राहुरी) याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी अक्षय विजय शिंदे (रा. गुहा, ता. राहुरी) याच्या विरोधात शिवीगाळ, मारहाण, धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button