रेडी नदीत टेम्पो गेला वाहून ; गाडीतील चारजण सुदैवाने बचावले | पुढारी

रेडी नदीत टेम्पो गेला वाहून ; गाडीतील चारजण सुदैवाने बचावले

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : भातकुडगाव फाटा ते दहिगावने या रस्त्यावरील बक्तरपूर येथील रेडी नदीला मोठा पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्यातून चालकाने घातलेला टेम्पो प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागल्याने एकाने उडी मारून जीव वाचवला. तर टेम्पोतील अन्य तिघांना तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वाचविले. शेवगाव, नेवासा तालुक्यात सोमवारी रात्री सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने परिसरातील सर्वच ओढेनाले भरून वाहिल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. भातकुडगाव फाटा ते दहिगावने या रस्त्यावर बक्तरपूर येथील रेडी नदीला मोठा पूर आला होता.

पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक दिवसभर बंद होती. अशातच मठाचीवाडी येथील आण्णासाहेब काटे यांनी दुपारी 3 च्या दरम्यान टेम्पो पाण्यातून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यात टेम्पो पाण्याच्या जोरदार प्रवाहात लोटला जाऊन नदीत पडला. दरम्यान गाडीतील चौघांपैकी एकाने पाण्यात उडी घेतली. त्यामुळे तो वाचला. इतर तिघे गाडी बरोबर पाण्यात लोटले गेले. मात्र, गाडी पलटी खाऊन नदीच्या कडेला गेल्याने इतर तिघांना तिथे उपस्थित असलेल्या सुनील गवळी, अनिल मेरड व इतरांनी सुखरूप बाहेर काढले. दोरखंडाच्या सहाय्याने गाडी तेथील गार्डस्टोनला बांधल्याने गाडीचे पुढील नुकसान टळले.

 

भातकुडगाव फाटा-दहिगावने, भातकुडगाव फाटा ते भातकुडगाव या दोन्ही रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास दिवसभर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद होती. परिसरातील शाळा, महाविद्यालय, बँक यांना अघोषित सुट्टी मिळाली होती. बक्तरपूर येथे रेडी नदीवर उंच पुलाची गरज आहे. दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होऊन वाहतूक बंद होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे.
-सुनील गवळी, ग्रा.पं. सदस्य, शहर टाकळी

Back to top button