नेवासा तालुक्यात मंकीपॉक्स सदृश रुग्ण, आरोग्य विभाग अनभिज्ञ; आज करणार तपासणी | पुढारी

नेवासा तालुक्यात मंकीपॉक्स सदृश रुग्ण, आरोग्य विभाग अनभिज्ञ; आज करणार तपासणी

भेंडा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा परिसरात तारापार्क वसाहतीत राहणार्‍या 3 ते 4 लहान मुलांच्या हात, पाय, तोंडाला फोड आले असल्याने त्यांना मंकीपॉक्स सदृश्य आजाराचा संसर्ग झाला की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला, प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी भेट देऊन तपासणी व निदान केले जाईल, असे सांगितले. नेवासा फाटा येथे रहात असलेल्या कोरोना एकल महिलेच्या घरी नेवासा तालुका एकल समितीचे कार्यकर्ते भेट देण्यास गेले असता, त्यांना हा संसर्गजन्य आजार झाल्याचे समजले. याबाबत विचारले, त्यांनी सांगितले, ‘माझी मुले बाहेर खेळत असताना इतरही एक-दोन मुलांना, तसेच माझ्या भावाच्या मुलांनाही अशाच प्रकारचा आजार झाल्याचे दिसून आले. यावरून नेवासा तालुक्यात मंकीपॉक्स सदृश्य आजार झाला की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.

त्यांच्या भावाच्या दोन मुली या मुलांसमवेत खेळत आसल्याने त्या दोन लहान मुलींनाही हा संसर्गजन्य आजार झाला आहे. त्यांनी ज्या खासगी बालरोग तज्ज्ञाकडे उपचार घेतले, त्यांनी मंकीपॉक्स असल्याची शक्यता व्यक्त केली; मात्र ठामपणे काही सांगितले नाही.
याबाबतची माहिती मिळाली आहे. या बाधित बालकांची आज सोमवारी तपासणी करणार आहे. यानंतरच निर्णय घेण्यात येईल, तसेच निदान करता येईल. आत्ताच काही सांगता येत नाही. निदान झाल्यावर योग्य उपचार केले जातील.
– डॉ.अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, नेवासा

Back to top button