राज्यात सध्या हुकूमशाहीचे राज्य आ. नीलेश लंके | पुढारी

राज्यात सध्या हुकूमशाहीचे राज्य आ. नीलेश लंके

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने अप्रत्यक्षपणे लोकशाहीला छेद देत प्रत्यक्षात हुकूमशाही सुरू केली आहे. तीन महिन्यातच जनता या सरकारला कंटाळली आहे. त्यामुळे या सरकारचा लवकरच गाशा गुंडाळला जाणार असल्याचे सांगत आमदार नीलेश लंके यांनी सरकारवर टीका केली. लोकसभा-विधानसभा निवडणुकांची एकत्रित भीती वाटू लागल्याने तालुक्यात काहींनी आपला वट निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. पारनेर तालुक्यातील सांगवीसूर्या येथे गुरूवारी (दि.13) जलजीवन योजने अंतर्गत 1 कोटी 54 लाख रूपये खर्चच्या पाणी योजनेचे उद्घाटन आ.लंके यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्या राज्यात हुकूमशाहीचे राज्य चालू असून, सत्तेच्या जोरावर ईडीची भीती दाखवून दबावतंत्राचा वापर करत दडपशाही चालू आहे, अशी टीका आमदार लंके यांनी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री थेट तालुक्याच्या तहसीलदारांना फोन करून दबाव आणत असल्याचे चित्र आहे. पण, आपण रडणार्‍यांमधील नसून लढणार्‍यांमधला माणूस आहे. गावा-गावात लोकांशी आपुलकीची नाळ जपून, त्यांचा विकास साधने हे आपले कर्तव्य समजणारा माणूस आहे. महिला भगिनींची पाण्याची वणवण थांबण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, तालुक्यातील पाणी, शिक्षण, आरोग्य यावर आपण प्रामुख्याने काम करणार असल्याचे आ. लंके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उद्योजक सुरेश म्हस्के, सरपंच मोहन आढाव, सुदाम पवार, आदर्श सरपंच डॉ.आबासाहेब खोडदे , विलास कोठावळे, नारायण साठे, राजेश्वरी कोठावळे, भाऊ आढाव, संदीप सालके, उपसरपंच शरद कोठावळे, नावनथ रासकर, इन्नूस शेख, उत्तम नगरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button