‘तो’ कंत्राटी अभियंता कोल्हापुरात रूजू? राहुरी विद्यापीठ वरिष्ठांची मेहेरबानीची जोरदार चर्चा सुरू | पुढारी

'तो' कंत्राटी अभियंता कोल्हापुरात रूजू? राहुरी विद्यापीठ वरिष्ठांची मेहेरबानीची जोरदार चर्चा सुरू

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागात काही दिवसांपूर्वी एका कंत्राटी अभियंत्याने एका ठेकेदाराकडे लग्न कार्यासाठी 50 हजारांची मागणी केली होती. त्याचवेळी सेवा खंडित कारवाई केल्याची माहिती मिळाली होती. परंतु संबंधित कंत्राटी अभियंत्यावर पुन्हा मेहेरबानी करून कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे नियुक्ती केल्याची चर्चा विद्यापीठ हद्दीत झडत आहे. उघडपणे फाईल मंजूर करण्यासाठी पैसे मागणी करणार्‍या ‘त्या’ कंत्राटी अभियंत्यावर नेमकी मेहेरबानी कोणाची? असा प्रश्न विचारला जात आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ हा कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्राला नविन दिशा देणारे माध्यम ठरले. पांढरा हत्ती, म्हणून ओळखल्या जाणार्‍या विद्यापीठाला काही अधिकार्‍यांनी काठे ठिपके लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या गैरव्यवहाराचा भांडाफोड होऊन विद्यापीठाची पत टिकविण्याचा मोठा प्रयत्न झाला. परंतु विद्यापीठात नेहमीच वादग्रस्त ठरणार्‍या बांधकाम विभागामध्ये पुन्हा एकदा वादाात्मक चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी एक कंत्राटी अभियंता एका ठेकेदाराशी चर्चा करीत असताना फाईल मंजुरीच्या मोबदल्यात 50 हजार रुपये मागत असल्याचा मोबाईल कॉल चांगलाच व्हायरल झाला होता. संबंधित कंत्राटी अभियंत्याने लग्नाची गडबड सुरू असून मला 50 हजार रुपये द्या. ते पैसे मला परत कसे देणार? असे सांगत ठेकेदाराने प्रश्न विचारला. त्यावर पुढील फाईल मंजूर करण्यातून मी तुमचे पैशांची परतफेड करतो, असे संबंधित अभियंता बोलत असल्याची चर्चा विद्यापीठामध्ये चांगलीच चर्चेची ठरली होती. ‘त्या’ व्हायरल चर्चेने विद्यापीठाच्या बांधकाम विभागामधील अनागोंदी कारभार पुन्हा उघडकीस येत असतानाच वरिष्ठांनी त्यास सेवा खंडित केली होती.
दरम्यान, संबंधित कंत्राटी अभियंत्यास पुन्हा कामावर रुजू केल्याची चर्चा होत आहे. त्यास कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयामध्ये नियुक्ती देण्यात आल्याची चर्चा आहे. ठेकेदारांकडून थेट पैशाची मागणी करीत असलेल्या ‘त्या’ कंत्राटी ठेकेदारावर नेमकी मेहेरबानी कोणाची अशी चर्चा आहे.

Back to top button