नगर : गुरुजींची ‘नाजूक’ प्रकरणेही चर्चेत ; उत्साही कार्यकर्त्यांची शिक्षक बँकेला वेगळी ‘दिशा’ | पुढारी

नगर : गुरुजींची ‘नाजूक’ प्रकरणेही चर्चेत ; उत्साही कार्यकर्त्यांची शिक्षक बँकेला वेगळी ‘दिशा’

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठताच, आता पुन्हा एकदा ‘गुरुजीं’चे राजकारण तापले आहे. रविवारी सर्वच मंडळांनी सभा, मेळावे, बैठका आणि जेवणावळींद्वारे जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याचे पाहायला मिळाले. त्यात, काही उत्साही कार्यकर्त्यांनी खासगीत विरोधकांची ‘नाजूक’ प्रकरणेही हातळल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षक बँकेची 16 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी डॉ. संजय कळमकर यांच्या गुरुकुल मंडळाने गृहभेटींवर भर दिला आहे. तसेच, सोमवारपासून थेट शाळांमध्ये जाऊन ते आपली प्रचार यंत्रणा राबविणार आहे. सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनीही प्रचारासाठी मायक्रो प्लॅन केला आहे. रोहोकले गुरुजींचाही संयमी प्रचार पाहायला मिळत आहे. चौथी आघाडीचे नेते राजेंद्र शिंदे यांनी तांबे, रोहोकले गुरुजी, डॉ. कळमकर यांच्यावर टीका करून सभासदांना चमत्कार घडविण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारे सर्वच मंडळांचा प्रचार जोरात सुरू असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या थेट चारित्र्याला हात घातला आहे. त्यामुळे साहजिकच दुसर्‍या बाजूनेही संबंधित मंडळातील श्रेष्ठींचीच ‘कुंडली’ तयार केल्याचे कानावर येत आहे. यातून ‘शिर्डी प्रकरण, कर्जतचे ‘ते’ प्रकरण, काही व्हिडिओंचे प्रकरण आणि संचालकपदाचे ‘राज’कारण, यावरही बोट ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे शिक्षकांची ही निवडणूक काहीशा वेगळ्यादिशेने जाण्याचीही भिती आहे. सुदैवाने चारही मंडळांच्या नेत्यांनी आपापल्या उत्साही कार्यकर्त्यांना समज देवून शिक्षकांचे पावित्र जपा, वैचारिक संघर्ष करा, पण कोणाच्याही ‘खासगी’त जाऊ नका, असे कान उपटल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून कळाले आहे.

नाराजी दूर होईना; नेते हतबल!
निवडणूक लागण्यापूर्वीच अनेकांना ‘त्या’ नेत्यांनी हळद लावून ठेवली होती. मात्र, ऐनवेळी त्यांचे पत्ते कट झाले. कुठे ‘आयात’ उमेदवारांना संधी दिली गेली, तर कुठे श्रेष्ठींनीच उमेदवार्‍या पदरात पाडून घेतल्या. काही ठिकाणी तर शेवटच्या क्षणी उमेदवार्‍या बदलण्यात आल्या. यातील काहींनी तर प्रचारही सुरू केला होता, मात्र त्यांना थांबविण्यात आले. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करताना नेतेमंडळी हतबल झाले आहेत. यातील काहीजणांनी दै. पुढारीशी बोलताना आपली उमेदवारी का, कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून कापली, याविषयी तिखट भावना व्यक्त केल्या.

हवसेे-नवसेे सांभाळताना नाकी नऊ!
शिक्षक बँकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने उमेदवारांना कार्यकर्ते सांभाळताना खिशाला मोठी झळ सोसावी लागली. अजूनही 13 दिवस कार्यकर्ते सांभाळावे लागणार असल्याने उमेदवार अक्षरशः हतबल झाल्याचे दिसत आहे. काही उमेदवारांनी ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशा शब्दात आपल्या भावना मांडल्या आहेत. नको तो निर्णय घेतला आहेच, तर आता आणखी थोडे दिवस कोणालाही दुखावून चालणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

Back to top button