शिक्षक बँकेच्या कर्ज वसुलीस नकार, जिल्हा परिषदेला हवाय सेवेचा मोबदला | पुढारी

शिक्षक बँकेच्या कर्ज वसुलीस नकार, जिल्हा परिषदेला हवाय सेवेचा मोबदला

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या मासिक वेतनातून जिल्हा परिषद शिक्षक बँकेला दरमाह 20 कोटी रुपयांची वसुली करून देते. या वसुलीचा अतिरिक्त भार कर्मचार्‍यांवर पडतो, तसेच स्टेशनरी खर्चही वाढतो. त्यामुळे शिक्षक बँकेने जिल्हा परिषदेला सेवा मोबादला द्यावा, अशी भूमिका घेत शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तसा करार होत नाही, तोपर्यंत शिक्षक बँकेची वसुली थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँकेच्या कर्जदार शिक्षकांना सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचे वेतन कपात न करता मिळणार आहे.  जिल्हा परिषद शिक्षकांचे दरमाह वेतन अदा करताना त्यातून शिक्षक बँकेची वसुली रक्कम कपात करते. कर्जापोटी शिक्षकाच्या पगारातून कपात झालेली रक्कम जिल्हा परिषद शिक्षक बँकेकडे पाठविते.

आता मात्र त्यापोटी जिल्हा परिषदेला सेवा मोबदला हवा आहे. 16 मार्चला झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत सेवा मोबादला मिळण्याचा विषय चर्चेला आला. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद राबवित असलेल्या उपक्रमावरील खर्च त्यातून भागविण्याचा त्यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सेवा मोबादल्यासंदर्भात बँक व जिल्हा परिषदेत करारनामा करण्यात येणार आहे. जोपर्यंत हा करारनामा होत नाही, तोपर्यंत कर्जदार शिक्षकांच्या पगारातून कोणतीही कपात करायची नाही, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. असा करार अद्याप न झाल्याने सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचा पगार कर्जदार शिक्षकांनी पूर्णपणे मिळणार आहे.

पुस्तक छपाई खर्चावरून बिघडलं
मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी नुकतेच एक पुस्तक संकल्पित केले आहे. जिल्ह्यातील 1300 शाळेत ते पुस्तके द्यायचे आहेत, त्याचा छपाई करण्याचा खर्च बँकेने करावा, अशी अपेक्षा आहे. एका पुस्तक छपाईसाठी किमान तीनशे रुपये खर्च अपेक्षित आहे. चार पुस्तकांचा तो सेट असून त्याचा खर्च 50 लाखांच्या पुढे जाऊ शकतो. सभासद हिताच्या दृष्टीने हा खर्च देण्यास बँकेने असमर्थता दर्शविली आहे.

जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था असल्याने उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकेने मोबदला सेवा करार करावा, तोपर्यंत सप्टेंबर व ऑक्टोबर 2022 च्या पगारातून बँकेची वसुली जिल्हा परिषद करणार नाही.
                           – भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

शिक्षक बँकेच्या वसुली संदर्भात शिक्षणाधिकार्यांचे पत्र पूर्वीच प्राप्त झालेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करु. सभासदांना विश्वासात घेऊन शक्य तो सेवा मोबदला देवून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
                                       – किसनराव खेमनर, अध्यक्ष, शिक्षक बँक

बँकेची निवडणूक सुरू असल्याने कोणताही निर्णय घेता येणार नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने वसुलीसाठी बँकेला किमान महिनाभर तरी सहकार्य करावे. त्यानंतर निश्चित चांगला मार्ग काढू.
                                                    – विकास डावखरे, शिक्षक नेते

 

Back to top button