कुकाणा : माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नामुष्की | पुढारी

कुकाणा : माजी आमदार मुरकुटेंची पुन्हा नामुष्की

कुकाणा : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या देवगाव विविधि कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुकीत माजी आमदार मुरकुटे यांना उमेदवारच न मिळाल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध सोडण्याची नामुष्की मुरकुटे गटावर आली. सत्तांतरानंतर झाल्याने सोसायटीच्या वार्षिक सभेते माजी आमदार मुरकुटे यांनी जयहरी विकास सोसायटी नवीन संस्था स्थापन करण्यासाठी ना हरकत दाखल्याची मागणी केली. नवीन संस्था स्थापनेला सभासद व संचालकांनी विरोध केला.

देवगाव सोसायटी विरोधक असो या सत्ताधारी कधीही कोणाची अडवणूक केलेली नाही. तसेच संस्थेचा कारभार देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्यामुळे व मुरकुटे हे सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थेचे सभासद असल्यामुळे त्यांना नवीन संस्था स्थापन करण्यासाठी ना हरकत दाखला देण्यात येऊ नये, अशी मागणी सभेदरम्यान संस्थेचे सभासद मारुती ठोंबरे त्याचबरोबर माजी चेअरमन ज्ञानदेव पाडळे यांनी केली. त्यास सर्वानुमते संमती दर्शवण्यात आली. परंतु जर कायद्यामध्ये तशी तरतूद असेल व कायद्याने जर दाखला द्यावाच लागत असेल, तर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यावर विचार करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

संस्थेची वार्षिक सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात गोरक्षनाथ निकम यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली. यावेळी संस्थेचे संचालक बाबासाहेब पाडळे, कचरदास गुंदेचा, राधाकृष्ण शिंदे, अजित मुरकुटे, महेश निकम, देवीदास पानसरे, शरद कदम, नामदेव निकम, एकनाथ गिलबिले, रावसाहेब निकम, बाबानाथ आगळे, सुभाष निकम, शिवाजी मोरे, मारुती ठोंबरे, कैलास रोडगे, नूरमोहम्मद शेख, ज्ञानदेव निकम, कुंदनमल भंडारी, शब्बीर सय्यद, सखाहरी आगळे, भाऊसाहेब मोरे, मच्छिंद्र काळेे होते. या गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला एक कोटी 27 लाखांचा नफा झाला असून, बँक पातळीवर संस्थेची शंभर टक्के वसुली होऊन संस्थेला तपासणी अहवालात अ दर्जा प्राप्त झाल्याचे सचिव बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले. सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी भगवान निकम, ज्ञानदेव पाडळे, रमेश तांदळे, गणेश आगळे, भानुदास भगत, बन्सी गवते उपस्थित होते.

सभासदांना 15 टक्के लाभांश जाहीर
यावर्षी संस्थेच्या सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करणार असून एकूण 25 लाख रुपये सभासदांना दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून वाटप केले जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निकम व उपाध्यक्ष सखाहरी गायकवाड यांनी सांगितले. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले.

Back to top button