नगर जिल्ह्यात घरकुल योजनेला ‘घरघर’! वाढती महागाई, अत्यल्प अनुदान | पुढारी

नगर जिल्ह्यात घरकुल योजनेला ‘घरघर’! वाढती महागाई, अत्यल्प अनुदान

नगर; पुढारी वृत्तसेवा: एकीकडे सिमेंट, विटा, वाळू आणि मजुरीचे गगनाला भिडलेले दर, तर दुसरीकडे शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान, यासह अन्य कारणांमुळे शासनाची घरकुले लाभार्थ्यांसाठी मृगजळ ठरताना दिसत आहे. शासनाच्या 1 लाख 20 हजारांत घर बांधणे शक्य नसल्याने, वर्षभरात 18 हजार 442 पैकी केवळ 645 असे 3.50 टक्के घरकुले पूर्ण झाल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर घरकुल लाभार्थ्यांची स्वतंत्र ‘ड’ यादी तयार झाली. ही यादी करतानाही चार वेळा सर्व्हे झाला.

अधिकार्‍यांनी अनेकदा संबंधित गरिबाच्या झोपडीत जाऊन ‘फोटोसेशन’ केल्याची चर्चा झडली. त्यानंतरही जाचक 18 अटी व नियमांची अग्निपरीक्षा पास केल्यानंतर यादीत नावे आली. त्यानंतर पहिल्यावर्षी उद्दिष्ट मिळाले, त्यावर किती बांधकाम सुरू झाले, किती लाभार्थ्यांना जागा नाही, यासह अन्य अडचणींवर सीईओ आशिष येरेकर हे वेळोवेळी आढावा घेत आहेत.

प्रकल्प संचालक संदीप कोहिणकर यांनीही बीडीओंच्या वेळोवेळी बैठका घेऊन वेळेत घरकुले पूर्ण कशी होतील, याकामी सूचना केल्या आहेत. अभियंता किरण साळवे, कांडेकर हेही या संदर्भात ग्रामपंचायत स्तरापर्यंत पाठपुरावा करत आहेत. मात्र, आर्थिक अडचणी, त्यात सध्याचा पावसाळा, वाळूची कमतरता, वाढलेली महागाई इत्यादी कारणांमुळे अजूनही घरकुलांना अपेक्षित गती मिळालेली नाही.

जिल्ह्यात दीड लाख पात्र लाभार्थी
जिल्ह्यात घरकुल ‘ड’ यादीतून तब्बल 1 लाख 64 हजार 360 पात्र लाभार्थी ठरलेले आहेत. संबंधितांच्या नावाच्या प्राधान्य याद्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह केंद्रीय स्तरावर ऑनलाईन सादर झालेल्या आहेत. दरवर्षीच्या उद्दिष्टानुसार या यादीतून लाभ दिला जाणार आहे.

पहिल्याच वर्षी 18 हजार 442 घरकुले मंजूर
‘ड’ यादी तयार झाल्यानंत्तर शासनाने पहिल्याच वर्षी 18 हजार 442 घरकुले मंजूर केली. त्यातून 1318 ग्रामपंचायतींना उद्दिष्ट वाटण्यात आले. एका गावात लाभार्थी 200 पेक्षा अधिक, तर घरकुले मात्र 10 आल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला.
13 हजार 810

घरकुलांची कामे सुरू
पहिल्या वर्षीच्या मंजूर 18 हजारांपेैकी 13 हजार 810 घरकुलांची कामे सुरू झाली आहेत. त्यासाठीचे जिओ टॅगिंग प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. यापैकी 12 हजार 920 कुटुंबांना पहिला हप्ता मिळाला आहे. 3875 कुटुंबांना दुसरा हप्ता, 1738 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता आणि 137 लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळालेला आहे.

‘मिशन वात्सल्य’मधून प्राधान्य द्या!
कोरोना काळात अनेकांच्या घरामधील कर्ता पुरुष गेल्याने संबंधित कुटुंबाचे छत्र हरपले आहे. अशा विधवा महिलांसाठी शासनाने मिशन वात्सल्य’मधून विविध योजनांचा लाभ देऊ केला आहे. यात घरकुल योजनेतही यादीत नाव असलेल्या महिलांना प्राधान्य देण्याबाबत सीईओ आशिष येरेकर यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी विलासराव ढोकणे यांनी केली आहे.

अकोले 2260 72
जामखेड 2230 119
कर्जत 2174 86
कोपरगाव 1029 39
नगर 624 13
नेवासा 1760 29
पारनेर 666 9
पाथर्डी 1494 35
राहाता 843 47
राहुरी 948 27
संगमनेर 1347 74
शेवगाव 1368 56
श्रीगोंदा 788 22
श्रीरामपूर 911 17

Back to top button