मुळात जोरधारा; भंडारदरा पाणलोटातही मुसळधार धरणात 22 हजार क्यूसेक पाण्याची आवक | पुढारी

मुळात जोरधारा; भंडारदरा पाणलोटातही मुसळधार धरणात 22 हजार क्यूसेक पाण्याची आवक

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरण पाणलोटात जोरदार पावसाने 22 हजार क्युसेकने पाणी धरणात जमा होत आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा विसर्ग 20 हजार क्यूसेक इतका वाढविण्यात आला. 2006 सालात मुळातून 44 हजार क्यूसेक उच्चांकी विसर्ग सोडण्यात आला होता. त्या उच्चांकी विसर्गाचा रेकॉर्ड यंदा मोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मुळा धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे नव्याने आवक होणारे पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मुळा नदी वाहती झाल्यापासून (14 ऑगस्ट) जायकवाडी धरणाच्या दिशेने 12 हजार दलघफू इतके पाणी वाहिले आहे. अजूनही विसर्ग सुरूच असल्याने यंदा जायकवाडीला पाणी देण्याचा उच्चांक स्थाापित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शुक्रवारी सकाळी 8 हजार, दुपारी तब्बल 20 हजार 828 क्यूसेक इतकी आवक धरणात सुरू असल्याने विसर्ग 20 हजार क्यूसेक इतका वाढविण्यात आला. उपअभियंता शरद कांबळे यांनी धरणाच्या सुरक्षितता व पूर नियंत्रण दृष्टीने राहुरी, सोनई, वांबोरी, धरण उपसा शाखा या ठिकाणावरील सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार व जबाबदारी कर्मचार्‍यांना आठवड्यातून दोन दिवसांसाठी मुळा धरण पूर नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. पूर नियंत्रक म्हणून अधिकार्‍यांसह सुमारे 24 तास उपस्थिती बंधनकारक केली आहे. संबंधित कर्मचार्‍यांकडून धरणाकडे होणारी आवकेची पाणी पातळी नोंदी ठेवत विसर्ग व आवकेचे प्रमाण राखणे, जलोत्सारणी परिसराची निरक्षण करणे, धोकादायक बाब घडत असल्यास तात्काळ वरिष्ठांना माहिती देणे, पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे, एकूणच धरणाच्या सुरक्षिततेबाबत नियोजनही संबंधित कर्मचार्‍यांकडून केले जात आहे.

मुळा धरणामध्ये यंदा 30 हजार 531 दलघफू पाणी नव्याने लाभलेले आहे. त्यापैकी 17 हजार 634 दलघफू पाणी धरणामध्ये जमा ठेवत साठा 25 हजार 650 दलघफू इतका स्थिर राखत उर्वरीत आवकेचे पाणी जाकयवाडीकडे वाहते आहे. उजवा कालवा 550 क्यूसेकने वाहत आहे. तर डावा कालवा बंद करण्यात आला आहे. यंदाच्या मान्सून हंगामात डाव्या कालव्यातून 133 दलघफू तर उजव्या कालव्यातून सुमारे अडीच हजार दलघफू इतके पाणी सोडले गेले आहे. पाण्याचा विसर्ग वाढविण्यापूर्वी लगतच्या नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या जात आहेत. धरण स्थळी सायरन वाजविल्यानंतर आवकेत वाढ होत आहे. मुळा नदी पात्रालगतच्या शेतकर्‍यांनी विसर्गात कमी जास्त प्रमाण होत असल्याने दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

सन 2006 मध्ये विसर्गाचा उच्चांक
सन 2006 मध्ये पूर आल्याने तब्बल 36 हजार दलघफू पाणी मुळातून जायकवाडीला जमा झाले होते. तर यंदाच्या वर्षी 12 हजार दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेन वाहिले आहे. अजूनही विसर्ग सुरूच असून पाणी सोडण्याचा यंदाही उच्चांक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तीन वर्षे ऑगस्टमध्येच धरण भरले
शक्यतो मुळा धरण सप्टेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने भरत असते. परंतु अपवादात्मक ऑगस्ट महिन्यातच तीनदा धरण भरले आहे. 29 ऑगस्ट 1997, 13 ऑगस्ट 2019 व 14 ऑगस्ट 2022 या तीन वर्षामध्ये लवकर धरण भरले.

पहिल्यांदाच केलेला प्रयोग यशस्वी ठरतोय- शरद कांबळे
मुळा पाटबंधारे विभागाची कर्मचारी संख्या अत्यल्प झाली आहे. परिणामी धरणाची सुरक्षितता व पूर नियंत्रण या उद्देशाने राहुरी, सोनई, वांबोरी शाखेतील कार्यालयिन व फिल्डवरील कर्मचार्‍यांना धरणस्थळी तैनात केले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसह विसर्ग व आवकेत समानता राखली जात आहे. असा प्रयोग पहिल्यांदाच केल्यानंतर तो यशस्वी ठरल्याचे समधान वाटत असल्याचे उपअभियंता शरद कांबळे यांनी सांगितले.

Back to top button