नगर : गावठी कट्टेे विकणारा जेरबंद | पुढारी

नगर : गावठी कट्टेे विकणारा जेरबंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात विक्रीसाठी आणण्यात आलेले चार गावठी कट्टे व 16 जिवंत काडतुसासह एका आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. तारकपूर बसस्थानकावरून आरोपीला पोलिसांनी अटक केली. तोफखाना पोलिसांत सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेंद्र सिंह बरनाला (वय 22, रा. उमरती, जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तारकपूर बसस्थानकावर एक व्यक्ती गावठी कट्टे व काडतुसांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी पथकाला कारवाई करण्यासाठी बसस्थानक येथे रवाना केले. आरोपीची ओळख पटण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचारी प्रवासी असल्याचा बनाव करून तारकपूर बसस्थानकावर थांबले होते. दरम्यान, पाठीवर बॅग असलेला एक इसम संशयितरित्या हालचाल करताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक करून त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे कट्टे, 16 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या कट्ट्यांची व काडतुसांची किमत एक लाख 31 हजार 200 रूपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.

कट्टे मूळगावी तयार केल्याची कबुली
दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर जप्त केलेले गावठी कट्टे आणि काडतुसे मध्यप्रदेशमधील मूळगावी स्वतः तयार करुन विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली आरोपीने दिली.

Back to top button