नगर : ढोल-ताशा पथकासाठी प्रथमच स्पर्धा : महापौर रोहिणी शेंडगे | पुढारी

नगर : ढोल-ताशा पथकासाठी प्रथमच स्पर्धा : महापौर रोहिणी शेंडगे

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट देखाव्यांना 21 हजारांचे प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. तर, यंदा प्रथमच ढोल-ताशा पथकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली. सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धा 2022-2023 साठी परीक्षण समितीची शुक्रवारी दुपारी महापौर कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला महापौर शेंडगे, स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, माजी नगरसेवक संजय चोपडा, सहाय्यक आयुक्त तथा गणेशोत्सव देखावे परीक्षण समितीचे अध्यक्ष सचिन राऊत, परीक्षण समितीचे पत्रकार मयूर मेहता, नाट्यकलाकार श्रेणिक शिंगवी, अनंत रिसे, शीतल परदेशी, इतिहास शिक्षक पारूनाथ ढोकळे, प्रसिद्धी विभाग प्रमुख शशिकांत नजान, व्हिन्सेंट फिलिप्स, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, सोनू चौधरी आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी गणेश मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन, पाणी बचत आदी व इतर समाज प्रबोधनपर देखावे, व्यसनमुक्तीपर देखावे, प्लॅस्टिक मुक्ती, बेटी बचाव बेटी पढाओ, या विषयावर देखावे सादर करावेत. ऐतिहासिक देखावे, धार्मिक व अध्यात्मिक देखावे, जिवंत देखावे-सोशल मीडिया व आधुनिक तंत्रज्ञान यासाठी प्रथम पारितोषिक 21 हजार, द्वितीय पारितोषिक 11 हजार, तृतीय पारितोषिक 7 हजार व सन्मानचिन्ह असे आहे. याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीत मराठमोळ्या संस्कृतीचे जपवणूक करणार्‍या समाज प्रबोधनपर, शिस्तबध्द व पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणार्‍या मंडळांना प्रथम पारितोषिक 11 हजार, द्वितीय 7 हजार, तृतीय 5 हजार असे पारितोषिक देण्यात येणार आहेत.

 

शहरामध्ये ढोल पथक मोठ्या स्वरूपात वादनाचे काम करीत आहेत. त्यांना देखील प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिने यावर्षी प्रथमच ढोल ताशा पथकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 सप्टेंबरला सकाळी प्रोफेसर कॉलनी चौक येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या वादकांचे परीक्षकांमार्फत पाहणी करून बक्षीस वितरण करण्यात येईल. प्रथम क्रमांकास 7 हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास 5 हजार व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. ढोलपथक वादकांसाठी फॉर्म सोबत अटी व शर्ती देण्यात येतील. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ढोल पथकांनी भाग घ्यावा
– रोहिणी शेंडगे, महापौर.

गणेश मंडळ चांगले देखावे सादर करत असतात. नागरिक देखील मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी येतात. सध्या कोविड, मंकी पॉक्स, अशा संसर्गजन्य आजारावर उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत देखाव्याच्या माध्यमातून मंडळांनी समाज प्रबोधन करावे. – कुमारसिंह वाकळे, स्थायी समिती सभापती

Back to top button