नगर : सहा पोलिसांवर 32 गावांचा भार! | पुढारी

नगर : सहा पोलिसांवर 32 गावांचा भार!

कुकाणा, सोपान भगत : नेवासा पोलिस ठाणे अंतर्गत येणार्‍या व संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुकाणा दूरक्षेत्राच्या 32 गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी अवघ्या सहा पोलिस कर्मचार्‍यांवर आहे.

नेवासा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यापैकी कुकाणा दूरक्षेत्राच्या अंतर्गत येणार्‍या गावांचे गुन्ह्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. एका प्रकरणावरून नेवासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बाजीराव पवार, तसेच पत्रकारावर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून काम केलं, तेथेच पोलिस निरीक्षकाला व एका पत्रकाराला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहण्याची वेळ आली. त्यामुळे नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात नेवासा पोलिस ठाण्यासह कुकाणा दूरक्षेत्राचे नाव चर्चेत आलेले आहे.

कुकाणा पोलिस दूरक्षेत्रात एकूण 32 गावांचा समावेश आहे. यातील आठ ते दहा गावे संवेदनशील असून, या गावांमध्ये कायमस्वरूपी गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी दाखल होत असतात. अशा 32 गावांचा कारभार चार पोलिस नाईक आणि दोन पोलिस कॉन्स्टेबल पाहत आहेत. यातील दोन कर्मचार्‍यांना नियमित नेवासा येथे ठाणे अंमलदार, तुरुंग रक्षक किंवा वायरलेस अशा ड्युट्या लागत असतात. त्यामुळे कुकाणा दूरक्षेत्रात केवळ चारच कर्मचारी उपलब्ध असतात. त्यातच प्रत्येक कर्मचारी आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुटी घेतो. त्यामुळे तीनच कर्मचार्‍यांवर 32 गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी येते. त्यातच या दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचार्‍यांना राहण्यासाठी सरकारी वसाहत नसल्याने त्यांची गैरसोय होते.

पोलिस ठाण्याची घोषणा कागदावरच!

गेल्या दहा वर्षांपासून कुकाणा पोलिस ठाणे मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकार्‍यांनी तसेच सांगितले. परंतु, पोलिस ठाणे केवळ कागदावरच मंजूर झाल्याचे दिसते. पोलिस ठाणे झाल्यास अधिकारी व जादा कर्मचारी उपलब्ध होऊन परिसरात गुन्हेगारीच प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत अंतरवालीचे सरपंच संदीप देशमुख यांनी मांडले.

पाच एकर जमीन, पण वसाहत नाही!

कुकाणा पोलिस दूरक्षेत्राच्या नावावर पाच एकर जमीन आहे. परंतु, या ठिकाणी पोलिस कर्मचार्‍यांना राहण्यासाठी सरकारी वसाहत नाही, हे दुर्दैव आहे. घर नसल्याने पोलिस कर्मचार्‍यांची अतिशय अडचण निर्माण होते. पोलिस कर्मचारी मुख्यालयी राहिल्यास गुन्हेगारीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल, असे मत कुकाण्याचे माजी सरपंच एकनाथ कावरे यांनी व्यक्त केले.

Back to top button