गाळमुक्तीचे धोरण रुतले गाळात ! मुळा धरणाची क्षमता अडीच टीएमसीने घटली | पुढारी

गाळमुक्तीचे धोरण रुतले गाळात ! मुळा धरणाची क्षमता अडीच टीएमसीने घटली

 रियाज देशमुख : राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या बांधकामाचा प्रारंभ 1959-60 सालात झाला. सुमारे एका तपानंतर बांधकाम पूर्ण होऊन 1972 पासून धरणाच्या बॅक वाटरमध्ये पाणी साठण्यास प्रारंभ झाला. बांधकामावेळी मुळा धरणाचा मूळ आराखडा 31 हजार 500 दलघफू क्षमतेचा होता. परंतू प्रत्यक्षात धरण 26 हजार दलघफू क्षमतेचे बांधले गेले. धरण बांधणी पूर्ण झाल्यापासून अतापर्यंत 33 वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची नोंद आहे. मुळा धरण बांधणीला 50 वर्ष पूर्ण झाले आहे. मुळा पाटबंधारे विभाग धरणाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात धरणातील गाळ उपसा करून क्षमता वाढेल अशी अपेक्षा लाभक्षेत्रातील नागरिकांना लागून आहे.

आजमितीला धरणात 25 हजार 200 दलघफू पाणी साठा स्थिर राखत उर्वरीत पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. 26 हजार दलघफू क्षमतेच्या धरणामध्ये सुमारे अडीच टिएमसी गाळयुक्त पाणी आहे. 4.5 टिोएमसी साठा मृत आहे. त्याचा सर्वाधिक परिणामी शेती सिंचनाला होत आहे. निर्मितीनंतर धरण 33 व्यांदा पूर्ण क्षमतेने भरल्याचा आनंद लाभार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

जायकवाडी, उजनीसह पाच प्रकल्पाचा गाळ उपसा
राज्यातील जायकवाडी, गोसी खुर्द, उजनी, गिरणा व हातनूर प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे धोरण ठरविण्याकरीता शासनाने वरिष्ठ पातळीवर समिती गठीत केली. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, कार्यकारी संचालक अशा वरिष्ठ अधिकार्‍यांचा समितीत समावेश आहे. या समितीच्या वरिष्ठ पातळीवर दोन बैठकाही झाल्या आहेत. मात्र धरणातून उपसा केलेला गाळ कोठे टाकायचा यासह विविधांगाने धोरण दोन बैठकीनंतरही निश्चित झालेले नाही. जायकवाडी प्रकल्पांतर्गत नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणाचा समावेश आहे.

असे आहे पाण्याचे वाटप
शेती 14 हजार 740 दलघफू, 323 दलघफू औद्योगिक क्षेत्र, 540 दलघफू महात्मा फुले कृषी विद्यापीठ , 680 दलघफू वांबोरी पाईपचारी, 60 दलघफू भागडा चारी, 420 दलघफू जलाशय उपसा, 1450 दलघफू बाष्पीभवन, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 1926 दलघफू साठा राखीव, 4 हजार 500 दलघफू मृत साठा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार धरणाच्या पाण्याचे नियोजन केले जाते.

उजव्या कालव्यावर 13 हजार 140 तर डाव्या कालव्यासाठी 1 हजार 600 दलघफू पाणी शेती सिंचनासाठी आरक्षित आहे. परंतू वाढत्या लोकसंख्येमुले पाणी योजना वाढत आहेत. नगर दक्षिणेत धरणाचे पाणी पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी वाटप होत असल्याने शेती सिंचनाच्या आरक्षित पाण्यावर गंडांतर येत आहे. धरणाची उंची वाढविणे किंवा गाळ उपसा करणे हे दोनच पर्याय आता शिल्लक राहिले आहेत.
                                                                      – प्रसाद तनपुरे, माजी खासदार

मुळा धरणाचा सुवर्णमहोत्सव सुरू असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाळामुळे धरणाची क्षमता 26 हजार दलघफुटावरून घटून 23 हजार 500 दलघफुटावर घसरली आहे. 2006 मध्ये ‘मेरी’च्या सर्वेक्षणात धरणात दीड टीएमसी गाळ असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतरच्या 16 वर्षात सुमारे एक टीएमसी गाळ वाढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. धरण गाळमुक्तीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने वरिष्ठ पातळीवर समिती गठीत केली, मात्र या समितीचे धोरणच गाळात रुतले आहे.

नगर शहराबरोबरच औद्योगिक कंपन्या व वसाहत, राहुरी व देवळाली नगरपरिषद, सोनई, बारगांव नांदूर, वांबोरी-सडे, बुर्‍हाणनगर, कुरणवाडी, सुपे अशा 9 पाणी योजना तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठालाही धरणातून पाणी पुरवठा होतो. ब्राम्हणी आणि पांढरी पूल पाणी योजना धरणाच्या पाण्यावर विसंबून आहेत. मुळा धरणाने नगर दक्षिणेचे पालकत्व घेत शेती, पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक क्षेत्रालाही मोठे बळ दिले आहे. वाढती लोकसंख्या व औद्योगिक क्षेत्राचा विस्तार पाहता शेती सिंचनाचे पाणी आरक्षित घट होत आहे. शेती सिंचनाचा वाढता प्रश्न हा जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरत असताना शासनाचे गाळ उपसा धोरण आणि उंची वाढविण्याचा अनेक वर्षाचा प्रयत्न अद्यापही फलद्रुप झालेला नाही.

40 कि. मी. पाणलोट क्षेत्र
मुळा नदीचा उगम हरिश्चंद्रगड परिसरात होतो. तेथून बारागाव नांदूरपर्यंत धरणाचे क्षेत्र व्यापलेले आहे. 17.60 किमीचा डावा तर 51.80 किमीचा लांबीचा उजवा कालवा आहे. वांबोरी पाईप चारी 58 मिमी, भागडा चारी 21 मिमी आहे. डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. उजव्यावर 70 हजार 689 हेक्टर क्षेत्र तर डाव्या कालव्यावर 10 हजार 121 हेक्टर शेती क्षेत्र अवलंबून आहेत. सुमारे 85 हजार 725 हेक्टर क्षेत्राचे भवितव्य मुळा धरणावर अवलंबून आहेत. धरणाचे पाणलोट क्षेत्र हा 40 किमी असून त्यात हरिश्चंद्रगड, कोतूळ, आंबीत, पाचणे, लहीत, साकूर, मांडवे, पिंपळगाव खांड, घारगाव क्षेत्राचा समावेश होतो. पिंपळगाव खांड हा मध्यम प्रकल्प आहे. आंबी, कोथळा, बलठण हे लुघ बंधारे आहेत.

 

 

Back to top button