श्रीगोंदा: रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना टेम्पोने उडविले ; दोन ठार, एक जखमी | पुढारी

श्रीगोंदा: रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना टेम्पोने उडविले ; दोन ठार, एक जखमी

श्रीगोंदा: पुढारी ऑनलाइन : नगर-दौंड महामार्गावरील कण्हेर मळा शिवारात ( कोळगाव) रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या तिघांना पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने दोघे पती- पत्नी ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. संभाजी मानसिंगराव मोहिते (वय-५०) , प्रियांका संभाजी मोहिते (वय-४५ रा सिद्धार्थनगर, नगर) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मोहिते दाम्पत्य दौंडहून ते आपल्या दुचाकीवरून नगरकडे जात होते.  दरम्यान त्यांची दुचाकी कण्हेर मळा शिवारात पंक्चर झाली. दुचाकी ढकलत घेऊन जात असताना घारगाव येथील दोघे जण पाठीमागून आले.

मदत करण्याच्या भावनेने त्या दोघांनी त्यांना थांबवत तुम्ही दुचाकी माझ्याकडे द्या व तुम्ही दोघे माझ्यासोबत चला असे म्हणाले. घारगाव येथील एका तरुणाने पंक्चर झालेली दुचाकी ढकलत पुढे जाण्यास सुरुवात केली. हे दोघे पती पत्नी दुचाकीवर बसत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर टेम्पोने या तिघांना उडविले. टेम्पोची धडक एवढी जोराची होती की संभाजी मोहिते हे जागीच ठार झाले.  प्रियंका मोहिते यांना टेम्पोने काही अंतर पुढे ओढत नेले. तर घारगाव येथील मदत करणारा तरुण बाजूला फेकला गेला.

अपघाताची माहिती समजताच कोळगावचे माजी उपसरपंच नितीन नलगे यांनी जखमी प्रियांका मोहिते यांना उपचारासाठी कोळगाव येथे नेले तिथून शासकीय रुग्णवाहिकेतून नगर येथे दाखल करण्यात आले उपचार सुरू असतानाच प्रियांका मोहिते यांचा मृत्यू झाला. अपघात होताच टेम्पो चालक टेम्पो जागेवर सोडून पळून गेला. घटनास्थळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Back to top button