रस्त्यासाठी अकोलेत संघटनांचे आंदोलन महात्मा फुले चौक ते मार्केट यार्ड रस्त्याची दुर्दशा | पुढारी

रस्त्यासाठी अकोलेत संघटनांचे आंदोलन महात्मा फुले चौक ते मार्केट यार्ड रस्त्याची दुर्दशा

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  शहरानजीकच्या महात्मा फुले चौक ते मार्केट यार्ड रस्त्याची दुर्दशा झाल्याने, अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र व युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिसरातील त्रस्त नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी खडीकरणाचे काम सुरू करण्याचे सा. बां. विभागाचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी तहसीलदार सतीश थेटे व सा. बां.विभागाचे उपअधिकारी महेंद्र वाकचौरे यांना निवेदन देण्यात आले.
या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मनीषा पुंडे ही युवती दुचाकीवरून पडल्याने तिला प्रचंड मार लागला असून, सध्या ती नाशिक येथे उपचार घेत आहे.

या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने संबंधित अधिकारी निधी मंजूर आहे, लवकरच काम सुरू करू, असे आश्वासन देत होते. मात्र, ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढविल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या शनिवारपासून खडीकरणास सुरुवात करू, असे आश्वासन यावेळी दिले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माधवराव तिटमे यांनी आंदोलनानंतर सा. बां. विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालण्याचा इशारा दिला. तालुक्यातील कामाचा दर्जा व गुणवत्ता नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचे ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक यांनी सांगितले.

यावेळी अरुण शेळके, युवा स्वाभीमान संघटनेेचे संस्थापक महेश नवले, ग्राहक पंचायतचे दत्ता शेणकर, रमेश राक्षे, रामदास पांडे, दिलीप वैद्य, भाऊराव नवले, दत्ता ताजणे, सुरेश नवले, दिलीप शेणकर, अ‍ॅड. बाळासाहेब वैद्य, अ‍ॅड. दीपक शेटे, अ‍ॅड. राम भांगरे आदींची आक्रमक भाषणे झाली. आपल्या भाषणात आंदोलनकर्त्यांनी सा.बां.विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी राम गुंजाळ, वैभव सावंत, किरण चौधरी, राम रूद्रे, सुनील गिते, अनिल वैद्य, भाऊसाहेब वाळुंज, दत्ता बंदावणे, शिवाजी साबळे, रामदास सोनवणे, सुदिन माने, रमेश भांगरे, श्रीकांत भुजबळ, भानुदास भांगरे, सलमान शेख, अनिकेत गिते, शिवाजी गिर्‍हे, सुदाम भले, अमोल पवार, बाळासाहेब कासार, सुधीर कानवडे, दीपक मोरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.

आतापर्यंत या रस्त्यावर 28 अपघात
या रस्त्यावर आतापर्यंत सुमारे 28 अपघात झाले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, याची कोणतीच दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आली. ग्राहक पंचायतीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मातीमिश्रीत मुरमाच्या आधारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

Back to top button