नगर : सिव्हिलमध्ये 64 बेडचे ‘आयसीयू’! लहान मुलांसाठी 18 बेडचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग | पुढारी

नगर : सिव्हिलमध्ये 64 बेडचे ‘आयसीयू’! लहान मुलांसाठी 18 बेडचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग

नगर : पुढारी वृत्तसेवा : आयसीयू जळीत कांडानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने दोन ठिकाणी पर्यायी अतिदक्षता विभाग सुरू केले आहेत. 25 बेडच्या दोन ‘आयसीयू’मध्ये रुग्णांना उपचार दिले जात आहे. त्यात, आता ‘ईसीआरपी’ अंतर्गत 64 बेडची आयसीयू उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडाला आठ महिने उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम कूर्मगतीनेच सुरू आहे. त्यामुळे रुग्णसेवा देताना जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची ससेहोलपट होत आहे.

जिल्हा रुग्णालयात 200 बेडची मंजुरी आहे. तेथे पूर्वी दोन आयसीयू होते. यातील खालच्या मजल्यावर 19, तर वरच्या मजल्यावर 24, असे 43 बेडचे आयसीयू कार्यान्वित होते. मात्र, नोव्हेंबरमधील दुर्घटनेत ग्राऊंड फ्लोअरवरील 19 बेडचे आयसीयू आगीत भस्मसात झाले. त्यात अनेक निष्पाप रुग्णांचाही जीव गेला. तेव्हापासून तो आयसीयू हॉल बंद होता. मात्र, दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतीच होती. कोरोनाचे रुग्णही लक्षणीय होते.

अशावेळी रुग्णालय प्रशासनाने पूर्वीचे जुने 11 बेडचे आयसीयू आणि नवीन तातडीने 14, अशाप्रकारे 25 बेडच्या आयसीयूमध्ये सेवा उपलब्ध करून दिली आहे. तेथे व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा करून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता ‘ईसीआरपी’ अंतर्गत सहा ठिकाणी आयसीयूचे काम सुरू आहे. त्यातून 64 बेडचे आयसीयू उभारले जात आहे. दोन आयसीयू प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार ठिकाणी कामे अंतिम टप्यात आहेत. यात, पूर्वीच्या जळीत झालेल्या आयसीयूचे नूतनीकरण केले जात असून, या ठिकाणी 18 बेड असणार आहेत.

लहान मुलांनाही आरोग्य सुविधा !
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी 16 बेडचे स्वतंत्र आयसीयू उभारले जात आहे. याशिवाय इतर आठ अत्यावश्यक सुविधेचे बेड असणार आहे. लहान मुलांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांच्या तुलनेत जिल्हा रुग्णालय हा मोठा आधार ठरणार आहे.

500 बेडची वाढीव क्षमता गरजेची
ग्रामीण भागासह शहरातील रुग्ण देखील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होता. मात्र, येणारी रुग्णसंख्या आणि बेडची संख्या यामध्ये तफावत असल्याने सेवा देताना येथील डॉक्टर, नर्सेस यांची तारेवरची कसरत सुरू असते. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून 500 बेडची क्षमता केल्यास आवश्यक ते मनुष्यबळ, सोयीसुविधा वाढतानाच रुग्णांनाही चांगली सेवा देणे रुग्णालय प्रशासनाला शक्य होणार आहे. बेड क्षमता वाढीसाठी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.

मनपा क्षेत्रात किती आयसीयू बेड?
जिल्हा रुग्णालयात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णांना उपचार दिले जातात. मात्र, या ठिकाणी शहरातील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. वास्तविकतः बहुतांश महापालिकांनी आयसीयू बेडची व्यवस्था केलेली आहे. मात्र, नगर महापालिकेने शहरात किती आयसीयू बेड उभारले, हा संशोधनाचा विषय आहे.

सहा वॉर्डमध्ये 64 आयसीयू बेड उभारले जात आहेत. तीन वॉर्डची कामे पूर्ण झालेली आहेत. पूर्वीचा जळीत वार्डही तयार झालेला आहे. या ठिकाणी विद्युत आणि एसीची कामे बाकी आहेत. लवकरच आयसीयू प्रकल्पाचे उद्घाटन केले जाईल.
                                            – डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्य चिकित्सक, नगर

Back to top button