दफनविधीवरून नेवाशात तणाव ; मृतदेहाची अवहेलना केल्याने मुस्लिम समाजाच्या 50 जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

दफनविधीवरून नेवाशात तणाव ; मृतदेहाची अवहेलना केल्याने मुस्लिम समाजाच्या 50 जणांविरुद्ध गुन्हा

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा बुद्रुक येथील नारदमुनी परिसरातील जागेबाबत औरंगाबादच्या वक्फ बोर्डाकडे न्यायप्रविष्ठ आहे. हा परिसर प्रतिबंधित असतानाही मुस्लिम समाजाच्या एका वृद्धाचा दफनविधी याच परिसरात करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी व पोलिस ठाण्यात मृतदेह आणून मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी मुस्लिम समाजाच्या 50-60 जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यशस्वी तोडगा काढल्याने रात्री उशिराने तणाव निवळला.

नेवाशातील मृतदेहावर नगर येथे दफनविधी करण्याचा निर्णय समाजाने घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व मृतदेहाची अवहेलना केल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी वाशीम इनामदार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, नेवासा बुद्रुक याठिकाणी नारदमुनी मंदिर आहे. यावरून हिंदू-मुस्लिम समाजाचा वाद आहे. या प्रकरणी औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाकडे प्रक्रिया चालू असून, वक्फ बोर्डाने हे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेले आहे. बुधवारी (दि.17) नेवासा बुद्रुक येथील बाबुलाल नबाब देशमुख हे मयत झाल्याने, त्यासाठी काही जण या परिसरात खड्डा खोदत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

प्रभारी तहसीलदार किशोर सानप, गटविकास अधिकारी संजय दिघे, ग्रामसेविका अनुसया बन्सी उन्हाळे यांना बोलवून मयताच्या नातेवाईकांना हा परिसर न्यायप्रविष्ट असल्याने याठिकाणी दफनविधी करू नका, असे समजवून सांगितले. मात्र, ते समजण्याच्या मनस्थितीत नव्हते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, 50 ते 60 इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवून मयत बाबुलाल नबाब देशमुख (रा.नेवासा) यांचा मृतदेह नेवासा पोलिस ठाण्याच्या आवारात घेऊन येऊन मृतदेहाची अवहेलना केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनीही मयताच्या नातेवाईकांना इतर ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

मृतदेह सध्या शासकीय रुग्णालयात
प्रतिबंधित जागेत दफन करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केल्याने, बुधवारी सायंकाळी मुस्लिम समाजाच्या लोकांनी बाबुलाल नबाब देशमुख यांचा मृतदेह थेट नेवासा पोलिस ठाण्यात आणून ठेवला. त्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती. दरम्यान, हा पेच सुटेपर्यंत मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांची यशस्वी मध्यस्थी
गुरूवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नेवाशात येवून मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संबंधित जागा न्यायप्रविष्ठ असल्याने तेथे दफनविधी करता येणार नाही असे सांगितले. दोन्ही प्रमुख अधिकार्‍यांश्यी झालेल्या चर्चेनंतर समाधान झाल्याने समाजाने भूमिका बदलली. नेवासा ऐवजी नगर येथेच दफनविधी करण्याचा निर्णय घेतला, तसेच शुक्रवारी केलेले नेवासा बंदचे आवाहनही माघारी घेतले. नेवासा बु येथे गट नंबर 992 मध्ये दफनभूमिसाठी जागा देण्याचे निर्णय प्रशासनाने घेतला. ती पसंत नसेल तर दुसरी जागा देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी भोसले यांनी दिले.

हे आहेत आरोपी
पठाण जुम्माखान, याकुब नवाब देशमुख, शब्बीर महमंद पठाण, आसिफभाई पठाण, अब्बास बागवान, इम्रान दारुवाला, शेख सलिम, जुबेर मनियार, इरफान शरिफ शेख, शोएब पठाण, पठाण नसिर बाबुलाल, शेख जाकौर, देशमुख इकबाल, बागवान इमरान, राजमहम्मद हसन पठाण, अल्ताफ पठाण, सलिम बाबुलाल पठाण, शेख कदौर, शेख मुस्ताक, तैनुर शेख व इतर

Back to top button