नगर : गंगथडी पट्ट्याला मिनीमंत्रालय दूरच! | पुढारी

नगर : गंगथडी पट्ट्याला मिनीमंत्रालय दूरच!

नेवासा, कैलास शिंदे : तालुक्यातील बेलपिंपळगाव गट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेहमीच चर्चेचा विषय असतो. या गटातील स्थानिक नेत्याने मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकदाही पाऊल ठेवलेले नाही. मात्र, इतर अनेक पदे उपभोगली आहेत. गंगथडीचा पट्टा म्हणून याकडे बघितले जाते. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बेलपिंपळगावातील स्थानिक नेत्याला या मिनीमंत्रालयाची आस लागून राहिली आहे.

जिल्ह्यातील राजकारणात नेवासा तालुक्याकडे सर्वांच्या नजरा असतात. त्यातच तालुक्यात सर्वत्र बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटाची चर्चा असते. या गटावर गडाखांचे वर्चस्व आहे. गंगथडीचा हा परिसर असल्याने या गटात अनेक समस्या आहेत. येथील जिल्हा परिषद सदस्य झालेल्यांनी त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्नही वेळोवेळी केला आहे.

हा जिल्हा परिषदेचा गट विचित्र आहे. या गटात कधी कोणाला मतदार पसंती देतात, तर कधी कोणाला डावलतात. त्यामुळे सर्वाचेच लक्ष वेधलेले असते. या गटातून विठ्ठलराव लंघे यांना जिल्हा परिषद सदस्य होऊन अध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे. मात्र, बेलपिंपळगाव गटातील मोठे गाव असल्याने या गटाला याच गावाचे नाव आहे. मात्र, गावातील कोणीच नेता जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. अनेक मातब्बर नेते गावात असून, आजपर्यंत मात्र कोणालाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी का मिळाली नाही, हा मोठा प्रश्न गावाला पडला आहे. यावर नेहमी चर्चा होत राहते आणि ती चर्चानंतर मात्र मागे पडते.

आजपर्यंत बेलपिंपळगावाला आमदार, सभापती, कारखाना अध्यक्ष, कारखाना संचालक, जिल्हा दूध संघ संचालक, बाजार समिती सभापती अशी महत्त्वाचे पदे गावाला मिळाली; पण जिल्हा परिषद सदस्य पद अजूनही कोणाला मिळालेले नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण बदलनार व गटांची व गणांची आहे तेच राहिल्याने अनेकांना आशा लागली आहे; तर आरक्षण बदलणार असल्याने अनेक स्थानिक नेते भेटी-गाठी, विचारपूस करताना दिसत आहेत.

नागरिकांचीही मोर्चे बांधणी

यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गावाला संधी मिळण्यासाठी गावातून प्रयत्न सुरू आहेत. यावेळी गावातील जिल्हा परिषद सदस्य व्हावा, अशी गावातील नागरिकांची इच्छा आहे. ती पूर्ण होते का नाही? हे आगामी काळात दिसणार आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत गावाला पंचायत समिती सभापती, बाजार समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा दूध संघाचे संचालक, अशी महत्त्वाची पदे मिळालेली आहेत. ज्याने त्याने आपापल्या परीने कामेही करण्याचा प्रयत्न केला; परंतु आता आणखी विकासासाठी आगामी निवडणुकीत बेलपिंपळगावातीलच नेत्याला संधी मिळते का? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

यंदा तरी संधी मिळेल का?

तालुक्यातील राजकारणात महत्त्वाचे गाव मानले जाते; पण या पदाने गावाला हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीत तरी या गवाला ही संधी मिळते का? आणि यामाध्यमातून गावाचा विकास करेल का? अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. या निवडणुकीत; मात्र ही संधी गावाला मिळते का? हे बघणे उत्सुकतेचे आहे. जर ही संधी गावाला मिळाली, तर कोण पहिला जिल्हा परिषद सदस्य होतो. याचीही उत्सुकता आहे.

बेलपिंपळगाव गटाने दिला पहिला आमदार

बेलपिंपळगावला भारत स्वतंत्र झाला आणि 1952 ते 1957 या काळात श्रीरामपूर- नेवाशाचे पहिले आमदार बेलपिंपळगाव येथील भावराव गोविंदराव चौगुले यांच्या रूपाने संधी मिळाली. त्यानंतर गावाला पंचायत समिती सभापती म्हणून आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर शिंदे यांच्या रूपाने संधी मिळाली. तसेच, त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अग्रगण्य असणारा अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच संचालक व अशोक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर नेवासा बाजार समिती सभापती म्हणून वसंतराव रोटे यांना संधी मिळाली, तर जिल्हा दूध संघाच्या संचालकपदावर वसंतराव शेरकर यांना संधी मिळाली, तसेच कांताबाई दत्तात्रय कांगुणे व रवींद्र सखाराम शेरकर यांना पंचायत समिती सदस्यपद मिळाले, आता अशोक कारखाना संचालक म्हणून तरुण अमोल कोकणे यांच्या रुपाने काम करत आहेत.

Back to top button