नगर : ‘त्या’ पुलाची विद्यालयाकडून दखल; प्रशासनाची मात्र चुप्पी | पुढारी

नगर : ‘त्या’ पुलाची विद्यालयाकडून दखल; प्रशासनाची मात्र चुप्पी

नगर तालका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या संतुकनाथ इंग्लिश विद्यालया समोरचा पूल सीना नदीच्या पुरात वाहून गेल्याने विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. पुलाची दुरुस्त अथवा नवीन बांधण्यात आलेला नाही. याकडे दैनिक पुढारीने लक्ष वेधले असता, विद्यालयाने विद्यार्थ्यांनी या पुलाचा वापर करू, नये अशी सूचना दिली; परंतु प्रशासनाची मात्र चुप्पीच आहे.

सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार येथे सुरू आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे हाल होत असताना तसेच जीविताला धोका निर्माण असताना विद्यार्थी वाहून गेलेल्या पुलावरून प्रवास करत आहेत. सीना नदीला पाणी वाहत असून, विद्यालयात जाण्यासाठी असणारा पूल वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करतात. या बाबीकडे पदाधिकारी, अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाले आहे. कोणताही नेता ही याबाबीकडे लक्ष घालण्यास तयार नाही.

संतुकनात विद्यालयाकडून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन विद्यार्थ्यांनी सदर पुलावरून ये- जा करू नये अशा सूचना देण्यात आल्या. पूल धोकादायक असून, विद्यार्थ्यांनी याचा वापर टाळावा असे म्हंटले आहे. विद्यालयाकडून वाहून गेलेल्या पुलाची दखल घेण्यात आली; असली तरी प्रशासनाची याबाबत चुप्पीच दिसून येते. पूल कधी बांधणार याबाबत कोणताही अधिकारी किंवा पदाधिकारी बोलण्यास तयार नाही. पूल दुरुस्तीसाठी जेऊर परिसरातील तरुणांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु अद्याप तरी त्याचा उपयोग झालेला दिसून येत नाही.

‘विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही’

संतुकनात विद्यालयाच्या पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे असताना अधिकारी व पदाधिकारी या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांकडून पूल तत्काळ दुरुस्त अथवा नवीन न झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा पालकांकडून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी धोकादायक पुलावरून ये-जा करू नये, याबाबत सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी बंद असलेला पर्यायी रस्ता खुला करण्यात आला. शाळा भरतेवेळी तसेच सुटण्याच्या वेळेस कर्मचारी पुलाजवळ थांबून विद्यार्थ्यांना पुलावरून ये-जा करण्यास मज्जाव करतात.

                                        – पंढरीनाथ कोकाटे, प्राचार्य, संतुकनाथ इंग्लिश विद्यालय.

Back to top button