‘नगर-शिर्डी’ला राजकीय ग्रहण! | पुढारी

‘नगर-शिर्डी’ला राजकीय ग्रहण!

नगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 420 कोटींचा निधी मिळाल्याने ‘नगर-शिर्डी’ या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले. मात्र, संबंधित ठेकेदार काम अर्धवट सोडून पळून गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे. नगर-मनमाड महामार्गावरील मोठ-मोठी खड्डी, त्यामध्ये पावसाचे साचलेले पाणी, त्यात दररोजची वाहतूक कोंडी, यामुळे प्रवाशी अक्षरशः हतबल झाले आहेत.

मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून नगर ते शिर्डी या 80 कि.मी. मार्गाच्या कामासाठी 420 कोटींची मंजुरी देण्यात आली होती. पुण्यातील शिंदे कन्स्ट्रक्शनला या कामाचा ठेका दिला होता. 31 ऑगस्ट 2021 रोजी कामाची वर्क ऑर्डर झाली होती. यावेळी 18 महिन्यात संपूर्ण काम करण्याची मुदत संबंधित ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती. यात काही भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, तर काही ठिकाणी नूतनीकरण करण्याचा आराखडा होता.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांच्या देखरेखीत हे काम सुरू झाले होते. मात्र, 3 मे 2022 पासून संबंधित ठेकेदार हा हे काम अर्धवट सोडून निघून गेला आहे. त्याने पुढील काम करण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगितले जात आहे. ठेकेदार काम सोडून गेल्याने रस्त्याचे दुरवस्था तशीच आहे. त्यामुळे नगर-शिर्डी मार्गावरून प्रवास करणे खडतर आणि तितकेच जोखमीचे बनले आहे.

दरम्यान, नगर- शिर्डी महामार्गावरून साई, शनिभक्तांसह दररोज लाखोंची वर्दळ सुरू असते. मात्र, अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेकेदार निघून गेला आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून ऐकरी वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रात्रीचे सोडाच दिवसाही वाहनांसह चालकांचीही कंबरडे मोडली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांच्या मुखातून ठेकेदार, लोकप्रतिनिधींच्या नावाने शिव्यांची लाखोळी बाहेर येताना दिसते.

ठेकेदार पळून गेला की पळून लावला!

‘नगर-शिर्डी’ या राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमिवर मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटनांनी देहरे टोलनाक्यावर फ्लेक्स बोर्ड उभा केला आहे. यामध्ये ‘अहो गडकरी साहेब, नगर-मनमाड रस्त्याचे काम करणारा ठेकेदार पळून गेला की पळून लावला..! असा सवाल केला आहे. या फ्लेक्सबोर्डची सोशल माध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे.

गॅस लाईनच्या कामानेही डोकेदुखी!

नगर-शिर्डी रस्त्याचे काम अर्धवट खोदकाम करून सोडून दिले असताना, दुसरीकडून गॅस लाईनच्या कामानेही प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाईप टाकण्यात आले आहे. तसेच जागोजागी जेसीबीसह अन्य साहित्य रस्त्यावर आल्याने एकेरी प्रवाशी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत गॅस लाईनचे काम बंद ठेवावे, असाही प्रवाशांचा सूर आहे.

ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि टक्केवारी..?

मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘नगर-शिर्डी’ महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडे काही ‘लोकप्रतिनिधींकडून’ टक्केवारी मागितली जात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या आरोपानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आता ठेकेदार हे काम अर्धवट सोडून गेल्याने खरोखरच याला ‘टक्केवारी’चे कारण आहे की अन्य काही.. ! याबाबत जनतेतून तर्कवितर्क काढले जात आहे.

नगर-शिर्डी या महामार्गाचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून ते बंद आहे. मे 2022 पासून संबंधित ठेकेदाराने हे काम बंद ठेवले आहे. त्याने काम परवडत नसल्याचे लेखी दिले आहे. त्यामुळे लवकरच सुधारित टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

– मिलिंदकुमार वाबळे, महाप्रबंधक तांत्रिक विभाग

Back to top button