नगर : बा. नांदूरला ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

नगर : बा. नांदूरला ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत होणारे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या आरोग्याच्या पथ्यावर पडत आहे. गावामध्ये ठिक-ठिकाणी साचत असलेला कचरा रोगराईला आमंत्रण देत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

बारागाव नांदूरमध्ये प्रथमदर्शनी असलेल्या शिवाजी चौकामध्ये घाणीचे मोठे साम्राज्य आहे. नावानुरूप स्वच्छता करीत स्वच्छ गाव.. सुंदर गाव, अशी वल्गना करणार्‍या बारागाव नांदूर ग्रामपंचायत प्रशासनाचे आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू आहे. साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून कोरोनाशी सामना करणार्‍यांना साथीच्या आजारांनी ग्रासले.

बारागाव नांदूरला अस्वच्छतेने पाण्याचे डबके साचत आहे. शिवाजी चौकातील डॉ. संजय गाडे व डॉ. दिनेश शहाणे यांच्या रुग्णालयासमोर गावातील काही व्यापारी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकत आहे. लालेसाहेब बालेसाहेब दर्गा परिसर असो की, बारागाव नांदूर गावाची वेस, सर्वत्र घाणीचा विळखा आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी स्वच्छता केली जाते. पावसाळा सुरू असल्याने कचर्‍याचे ढीग व घाण पाहता गावात डासांचा फैलाव वाढला आहे. मलेरिया, गोचीड ताप, टायफॉईडसह डेंगूचे अनेक रुग्ण बारागाव नांदूर परिसरात दिसतात. लहान मुलांचा डासांचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी ग्रामस्थांच्या समस्या संपुष्टात आणण्याऐवजी आरोग्य समस्या वाढविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत असल्याने ग्रामस्थ संतापले आहे.

सतत पडणार्‍या रिमझिम सरींचा वर्षावाने कचर्‍याचे ढिग गावामध्ये अस्ताव्यस्त पसरत आहे. अंतर्गत गटारी असतानाही अनेक ठिकाणी चेंबर फुटलेल्या अवस्थेत आहे. याकडेही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही.

घंटागाडी गायब…घंटा ट्रॅक्टरही धड नाही!

बारागाव नांदूर ग्रामपंचायतीची घंटागाडी गायब झाली. परिणामी घंटा ट्रॅक्टर तयार करून कचरा गोळा केला जातो. ट्रॅक्टरची ट्रॉली मोठी असल्याने कचरा टाकताना अनेक महिला जखमी झाल्या. ट्रॅक्टरमध्ये कचरा संकलन करताना कचरा गोळा करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने अडचणी येतात. ग्रामपंचायतीने घंटा टॅ्रक्टरवर कचरा संकलनाची योग्य सोय करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button