कोंभळी : ‘सीईओ’ येरेकरांनी धरली पाभरीवर मूठ | पुढारी

कोंभळी : ‘सीईओ’ येरेकरांनी धरली पाभरीवर मूठ

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार कर्जत तालुका पंचायत समितीने 15 ऑगस्टपर्यंत अमृत पंधरवडा अभियान राबविण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी कर्जत तालुक्याला भेट दिली. यावेळी थेरगाव येथे विविध विभागांनी केलेल्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांना खते वाटप करून स्वतः पाभरीच्या चाढ्यावर मूठ धरून कपाशीला खतांची पेरणी केली.

या अभियानांतर्गत येरेकर व कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने शेतकर्‍यांना बांधावर जाऊन खत वाटप केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या हस्ते शेतकर्‍यांना डीएपी व युरियाचे वाटप करण्यात आले. यावेळी येरेकर यांनी शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष संवाद साधून बांधावर खत वाटल्याने शेतकर्‍यांना काय फायदा होतो का, असे विचारले. शेतकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे सांगितले, हा उपक्रम अतिशय चांगला असून, शेतकर्‍यांना दुकानाच्या लाईनमध्ये उभा राहून जो त्रास होतो, तो टळणार आहे.

तसेच, अधिकारी बांधावर आल्यानंतर पिकांसाठी लागणारी योग्य खताची मात्राबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन होईल. वाहतुकीचा खर्च वाचेल. योग्य वेळी खतेही उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे सर्व शेतकर्‍यांनी सांगितले.
येरेकर यांनी कपाशीच्या शेतात संपत कुशाबा शिंदे यांच्या बैल व पाभरीद्वारे खताची पेरणी केली. यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता दुतर्फा एक किलोमीटर लावलेल्या 600 नारळाच्या झाडांची पाहणी केली.

या झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल.गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टिम, बाला उपक्रम, डिजिटल स्कूल, प्रत्यक्ष अध्ययन वर्गालाही भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये टॅबद्वारे मुलांनी केलेला अभ्यास पाहून त्यांचे कौतुक करून अंगणवाडीने राबविलेले बाला उपक्रम, डिजिटल अंगणवाडी, परसबाग, खेळ कोपरा, बोध कोपरा, हस्तकला कोपरा आदीची अशिष येरेकर यांनी पाहणी केली.

रोजगार हमी योजनेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा होजगे, कार्यकारी अभियंता जोशी, गटविकास अधिकारी अमोल जाधव, कृषी अधिकारी रुपचंद जगताप, उपअभियंता दिलीप कानगुडे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी कृषी अधिकारी मुकुंद पाटील, विस्तार अधिकारी लगड आदी उपस्थित होते.

Back to top button