36 वर्षे जुना दगडी पूल कोसळला, सुदैवाने जीवित हानी टळली | पुढारी

36 वर्षे जुना दगडी पूल कोसळला, सुदैवाने जीवित हानी टळली

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील शिरापूर – नरसाळे वाडी रस्त्यावरील शिरापूर गावालगत असलेल्या ओढ्यावरील 1986 सालचा दगडी पूलाचा एक दगडी खांब कोसळल्याने पूल खचला. वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. चोंभूत – शिरापूर – नरसाळेवाडी -निघोज असा महत्वपूर्ण रस्ता असून, या रस्त्यावरून जांबुत (शिरूर) येथील आठवडे बाजारासाठी लोक ये- जा करत असतात, तसेच शाळेच्या स्कूल बस याच मार्गावरून जातात. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

या पुलाचे बांधकाम दगडी असून, साधारण 1986 साली बांधकाम झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. मागील तीन वर्षांपूर्वापासून होत असलेल्या अति पर्जन्यामुळे गावालगतचा ओढा नेहमी तुडुंब व वेगाने वाहत असतो. या कारणामुळे पुलाचा दगडी खांब कोसळला असल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पुलाची पाहणी सरपंच हनुमंत भोसले, उपसरपंच संतोष नरसाळे,माजी सरपंच भास्कर उचाळे,माजी उपसरपंच संतोष शिनारे, माजी सरपंच गणपत शिनारे, मच्छिंद्र उचाळे, दत्ता चाटे, नागेश लोणकर यांनी करून तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्घटना ग्रस्त पुलाची माहिती इतर नागरिकांना दिली, हा रस्ता ताबडतोब वाहतुकीसाठी बंद केला.

आणखी एक पूल धोकादायक!

शिरापूर – चोंभूत रस्त्यावरील जनसेवा हॉटेल शेजारील दगडी पूल धोकादायक झाला असून, तोही पूल 1986साली बांधला आहे. तो पूल केव्हाही कोसळू शकतो व मोठी हानी होऊ शकते; मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button