सीना नदीला महापूर ! महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडले | पुढारी

सीना नदीला महापूर ! महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडले

नगर :  पुढारी वृत्तसेवा : सलग दोन दिवस नगर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदीला महापूर आला. तर, शहरातील ओढे नाले भरून वाहिले. त्यामुळे अनेक घरांत पाणी घुसले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यात महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडून गेले. दरवर्षी पावसाळा आला की सीना नदीला पूर येतो आणि पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसते. हे आता नित्याचेच झाले आहे. मागील वर्षीही सीनेला पूर आल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते.

त्याचीच पुनरावृत्ती गुरूवारी रात्री झालेल्या पावसाने झाली. गुरूवारी रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू सुरू होता.
नगर शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीला महापूर आला. सावेडी-बोल्हेगाव पूल, वारूळचा मारूती पूल, कल्याण रोड पूल, बुरूडगाव पूल असे पाच पूल पुराच्या पाण्याखाली गेले. त्यामुळे सकाळी नगर शहरात कामासाठी येणार्‍या नागरिकांचा खोळंबा झाला.

नाले बुजल्याने पूरस्थिती
शहरातील अनेक भागात नैसर्गिक नाले बुजवून बांधकामे केल्याने पाण्याचा प्रवाह अडविला गेला. परिजात चौक, गुलमोहर रोड, सायंतारा हॉटेल, सावेडी गाव संघर्ष चौक, आंबेडकर चौक बोल्हेगाव, समता कॉलनी, आकाशवाणी केंद्राजवळ, या भागासह बोल्हेगाव, अभियंता कॉलनी, निर्मलनगर, नालेगाव, रामवाडी, नालेगाव आदी भागात घरांत-तळघरात पाणी घुसले. तर, नालेगाव, वारूळचा मारूती आदी भागात सीना नदीच्या पुराचे पाणी घुसले.

कल्याण रस्त्यावर वाहतूक ठप्प
नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद होती. दुपारी बारा वाजता नदीचे पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अनेकांनी बाह्यवळण रस्त्याने थेट नगर शहर गाठले. नगर-कल्याण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आयुक्तांकडून पुराची पाहणी
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी शुक्रवारी सकाळी नगर-कल्याण रस्ता परिसरात जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. नदी पात्रालगत असणार्‍या परप्रांतीय नागरिकांच्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या. तर, विक्रीसाठी मांडलेेले साहित्य पाण्यात वाहून गेले. यावेळी माजी नगरसेवक निखील वारे व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

 

Back to top button