नगर : देवगावात फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती | पुढारी

नगर : देवगावात फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती

कुकाणा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवगाव येथे निकम वस्तीजवळ फुटलेल्या मुळा उजवा कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती चिलेखनवाडी उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण दहातोंडे यांनी दिली.

भेंडा-कुकाणा, चिलेखनवाडी, तरवडी, अंतरवाली या सहा गावांच्या पाणी योजनेसाठी मुळा उजव्या कालव्यातून मुळा धरणाचे पाणी सोडण्यात आले असता, दि. 15 जुलै रोजी पहाटे 3 वाजता हा कालवा देवगाव येथे फुटला. त्यामुळे कालव्यातील लाखो लिटर पाणी वाया जाऊन काही पिकांचे नुकसानही झाले होते.

कालवा फुटल्याने साठवण तलाव 50 टक्के भरला गेला होता. मात्र, तलावत पाणी अपुरे पडू लागल्याने भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी वापर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली शिंदे, त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीप ऊर्फ पप्पू देशमुख यांनी पाटबंधारे विभागाकडे कालवा दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने भविष्यात राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे व मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात देखील बर्‍यापैकी पाऊस पडत असल्यामुळे धरण भरल्यास कालव्यात पाणी सोडावे लागणार असल्यामुळे कालवा दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आल. परंतु सतत पाऊस चालू असल्याने प्रत्यक्ष कालवा दुरुस्तीचे काम 21 जुलै रोजी सुरू करण्यात आले. यासाठी जलसंपदा विभागाचे नाशिक येथून एक पोकलेन, एक जेसीबी, तीन डंपर, एक रोलर अशी यंत्र सामग्री मागविण्यात आली होती. या यंत्रांच्या साह्यानेे कालवा दुरुस्तीचे काम आठ दिवसांत पूर्ण करून पाणी वहनासाठी कालवा तयार करण्यात आला आहे.

कालवा दुरुस्तीसाठी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिलेखनवाडी उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण दहातोंडे, कुकाणा सिंचन शाखेचे शाखाधिकारी खर्से, कालवा निरीक्षक पोपट दरदंले, श्रीकांत करंजे यांच्या उपस्थितीत कालव्याचे काम पूर्ण करण्यात आले. एक रोटेशननंतर कालव्याच्या साईट कठड्याला काँक्रिटीकरण करणार आहेत.

Back to top button