तेरुंगण तलावातील पाणीपातळी घटली; भीमाशंकरसह भागात तीव्र पाणीटंचाई

तेरुंगण तलावातील पाणीपातळी घटली; भीमाशंकरसह भागात तीव्र पाणीटंचाई

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर आणि आदिवासी भागातील परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथील पाझर तलावाच्या गळतीमुळे या पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे भीमाशंकरसह कोंढवळ भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सध्या या तलावामध्ये 11 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यामध्येच भीमाशंकर व परिसरामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. भीमाशंकर परिसरातील तेरुंगण येथील पाझर तलाव चालू वर्षी पूर्णक्षमतेने भरला होता. या वर्षी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबून त्यांना सुखाचे दिवस येणार होते. परंतु, या तलावामधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्यामुळे तलावात पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

सध्या कोंढवळ येथील वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी. या पाझर तलावातील गाळ काढून तलावाचे खोलीकरण केले, तर या भागातील पाणी प्रश्न कायमचा मिटेल.

– सविता रमेश दाते, ग्रामपंचायत सदस्या, कोंढवळ

भाविकांसह पर्यटकांना पाणीटंचाईच्या झळा

उन्हाळा वाढत असल्याने पाण्याचा साठा अत्यंत कमी झाला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी दिवसाआड पाणी सोडले जात आहे. सध्या उन्हाळ्याची सुटी असल्याने भीमाशंकरला येणार्‍या भाविकभक्त, पर्यटक व निसर्गप्रेमी यांना दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. 10 वर्षांपासून क्षेत्र भीमाशंकर परिसरात असणार्‍या तेरुंगण पाझर तलावामुळे ढगेवाडी, भीमाशंकर, म्हातारबाची वाडी, तेरुंगण, निगडाळे या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्याने हा पाझर तलाव भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news