नगर : गायीला 1 लाख 31 हजाराची किंमत | पुढारी

नगर : गायीला 1 लाख 31 हजाराची किंमत

चांदेकसारे, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील संतोष सुभाष लांडगे यांच्या पहिलारू कालवडीला तब्बल 1 लाख 31 हजार रुपये इतकी विक्रमी किंमत मिळाली. हा कोपरगाव तालुक्यातील गायीला मिळालेल्या किमतीचा विक्रम झाला आहे.

चांदेकसारे येथील ग्रामस्थांनी लांडगे यांचे कौतुक करत उत्कृष्ट प्रकारे कालवडीची जोपासना केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. नांदूर मधमेश्वर येथील सोमनाथ कारभारी कहाने यांनी ही कालवड विकत घेतली आहे. विक्री झालेल्या कालवडीची ढोल-ताशे यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनाही फेटे बांधण्यात आले.

यावेळी माजी सरपंच केशवराव होन, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गोरक्षनाथ रोकडे, जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक जयद्रथ होन, सुभाष लांडगे, साहेबराव लांडगे, बाळासाहेब लांडगे, ग्रामसेवक प्रल्हाद सुकेकर, शरद होन, अण्णासाहेब होन, किशोर लांडगे, धर्मा दहे, डॉ. देविदास होन, डॉ. मनोज अनारसे, सौरभ रोकडे, राहुल कहाने, विशाल कहाने, प्रदीप कहाने आदी उपस्थित होते.

या कालवडीची आई मेल्यानंतर एक दिवसाची कालवड दुसर्‍या गाईचे दूध पाजून व औषधोपचार करून सांभाळली. चांगल्या शेतकर्‍यांनी ही गाय विकत घेतल्याने आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया सुभाष लांडगे यांनी दिली. एचएफ हरियाना, पंजाब जातीची ही कालवड असून विमान 30 ते 35 लिटर दूध देण्याची अपेक्षा आहे. कालवड खरेदी करताना हौस व कालवडीच्या रूपाने भारावून गेलो असल्याचे कहाने यांनी सांगितले. कोपरगाव तालुक्यात आत्तापर्यंत 1 लाख 11 हजार व 1 लाख 21 रुपये इतका गाय खरेदीचा विक्रम झालेला होता. मात्र. या विक्रमाला लांडगे यांच्या गायीने मागे टाकत जास्त किंमत येण्याचा विक्रम आपल्या नावावर केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Back to top button