नगर : हर हर महादेवा..जयघोषाने दुमदुमला आसमंत | पुढारी

नगर : हर हर महादेवा..जयघोषाने दुमदुमला आसमंत

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : टाळ मृदंगच्या गजरात जामखेडला मंगळवारी (दि. 2) श्रीनागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी ‘हर हर महादेवा… ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने जामखेड शहर दुमदुमून गेले होते. कलशधारी महिला, पताकाधारी तरुण यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली.

ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंगळवारी सकाळपासूनच मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. सकाळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
आरती करून श्रीनागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला. ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. नंतर हरहर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात व भजनी मंडळांच्या टाळ, मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.

पालखीची गाव प्रदक्षिणा

खर्डा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, जयहिंद चौक, कचेरी रस्ता, परिट गल्ली, महादेव गल्ली मार्गे पुन्हा खर्डा रस्त्याला आली. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा नागेश्वर मंदिरावर पोहोचला. या ठिकाणी आमदार पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मधुकर राळेभात, दत्ता वारे, हरिभाऊ आजबे, विकास राळेभात, मंगेश आजबे, रमेश आजबे, सूर्यकांत मोरे, अमोल गिरमे, अमोल लोकरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, सीताराम राळेभात, रावसाहेब कोल्हे, अश्रू कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, दीपक महाराज गायकवाड, बाबा मुरूमकर, दादा आजबे, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, शंकर माळी, ईश्वर महाराज तौर, जगदीश महाराज आळंदीकर, ओम महाराज आळंदीकर, विष्णू म्हेत्रे यांच्या समवेत विठ्ठल भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे दादासाहेब महाराज सातपुते व टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, संतोष बारगजे, मिलिंद ब्रह्मे, अशोक गिरमे, अमोल लोहकरे, दिलीपकुमार राजगुरू, प्रवीण राऊत, शंकर राऊत, आनंद राजगुरू, सचिन वराट, सुधाकर हराळे, महादेव पानसांडे, दत्ता राऊत, चंद्रकांत राऊत, विनायक राऊत, बिभिषण वैजाळकर, राजेंद्र जाधव, अशोक निकम, किरण सोनवणे, सागर राळेभात, दादा म्हेत्रे, अनिल फरांडे, अण्णासाहेब भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता

शुक्रवारी (दि.5) गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. ग्रामदैवत श्रीनागेश्वरची नागपंचमीनिमित्ताने यात्रा भरते. 19 वर्षांपासून यानिमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

दिंडी मार्गावर सडा, रांगोळी

दिंडी मार्गावर महिलांनी सडा, रांगोळी केली होती. शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. संपूर्ण जामखेड शहर भक्तिमय झाले होते. दुपारी दिंडोरीप्रणित स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकर्‍यांनी येथे रुद्रयाग व होमहवन केले. पालखी सोहळ्यानिमित्त येथे आयोजित करण्यात सप्ताहाची गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे.

Back to top button