नगर : पदवीधरसाठी नव्याने मतदार नोंदणी | पुढारी

नगर : पदवीधरसाठी नव्याने मतदार नोंदणी

नगर, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीसाठी 85 हजार 286 मतदार होते. नव्याने मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत पदवीधर असणे आवश्यक आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मतदार नोंदणी सुरू केली आहे.

आमदार डॉ. तांबे यांचा कार्यकाल 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. नवीन मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने 19 जुलै रोजी कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर होताच आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी मतदारसंघातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार आदी जिल्ह्यात दौरे सुरू आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने पदवीधर युवकाची मतदार नोंदी सुरु केली आहे. शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आल्यामुळे भाजपच्या वतीने निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या वतीने या निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे 1 ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी कार्यक्रम प्रसिध्द होणार आहे. मतदार नोंदणी झाल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी यादी प्रसिध्द होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. यावर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार असून, 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.

डॉ. तांबे तिसर्‍यांदा विधान परिषदेवर

या मतदारसंघातून सन 2004 मध्ये भाजपचे प्रताप सोनवणे विजयी झाले होते. परंतु, सन 2009 मध्ये ते धुळे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे रिक्त जागेची पोटनिवडणूक होऊन डॉ. तांबे विजयी झाले. त्यानंतर एक वर्षाने पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी देखील डॉ. तांबे विजयी झाले. सन 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत पाटील यांचा पराभव करुन डॉ. तांबे तिसर्‍यांदा विधान परिषदेवर गेले. एकेकाळी भाजपचे ना. स. फरांदे यांचा हा बालेकिल्ला होता. त्यांनी विधान परिषदेचे सभापतिपद देखील भूषविले आहे.

Back to top button