पाथर्डी : कासार पिंपळगाव गट राजळे विरुद्ध राजळे | पुढारी

पाथर्डी : कासार पिंपळगाव गट राजळे विरुद्ध राजळे

पाथर्डी तालुका, अमोल कांकरिया : तालुक्यातील पाच जिल्हा परिषदेच्या गटतील आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांच्या पतींना, तर पती सदस्य असलेल्या पत्नीला येणार्‍या निवडणुकीत अनुकूलता असणार आहे. कासार पिंपळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या गटात मोनाली राजळे विरूद्ध योगिता राजळे, अशी लढत होवूशते असून, राजळे विरूद्ध राजळे एकमेकांसमोर उभे ठाकतील.

या गटात पूर्वी आमदार मोनिका राजळे यांचे दीर राहुल राजळे सदस्य म्हणून निवडणून आले होते. महिला आरक्षणामुळे आमदार राजळे यांच्या जाऊबाई मोनाली राजळे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, तर भालगाव जिल्हा परिषद गट पूर्वी सारखाच राहिल्याने या गटातून जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. माळी बाभुळगाव गट सर्वसाधारण झाल्याने याठिकाणी सदस्या संध्या आठरे यांचे पती पुरषोत्तम आठरे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.

मिरी गट सर्वसाधारण झाल्याने या गटाच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक पुढे येत आहेत. या गटात यापूर्वी शिवसेनेचे स्व. अनिल कराळे विजय झाले होते. टाकळी मानूर गट पूर्वी ओबीसी महिला आरक्षित होता. हा गट सर्वसाधारण झाल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्या ललिता शिरसाट यांचे पती अर्जुन शिरसाट येणार्‍या निवडणुकीत उमेदवारी करतील, तर यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला शिरसाट यांचे पती गाहिनाथ शिरसाट असू शकतात. त्यामुळे शिरसाट विरुद्ध शिरसाट असा सामना या गटात संपूर्ण तालुक्याला पहाला मिळेल. परंतु पक्षश्रेष्ठी विद्यमान सदस्यांना संधी देतात का? नवीन चेहर्‍यांना निवडणुकीत उतरवतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ढाकणे विरुद्ध भाजप लढत पहायला मिळणार

कासार पिंपळगाव गटात भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. राजळे विरुद्ध राजळे लढत होऊ शकते. भालगाव जिल्हा परिषद गटात ढाकणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ढाकणे विरुद्ध भाजप अशी लढत पहायला मिळेल. माळी बाभुळगाव गटात भाजप आणि राष्ट्रवादी आमने- सामने असणार आहे. मिरी गटात शिवसेना,भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. टाकळी मानूर गटात भाजप आणि राष्ट्रवादी, अशा दोन पक्षात लढत असेल.

Back to top button