नगर : मुळा पाटचारीवरील पूल खचला | पुढारी

नगर : मुळा पाटचारीवरील पूल खचला

ढोरजळगाव, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील अमरापूर-आव्हाने रस्त्यावरील मुळा पाटचारीवरील पूल खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

परिसरातील आव्हाने, ढोरजळगाव, वाघोली, वडुले व परिसरातील गावांना अमरापूर, पाथर्डी, शेवगाव या ठिकाणांना जोडणार्‍या रस्त्यावर मुळा पाटचारीवर असलेल्या पुलाच्या एका बाजूच्या नळ्या फुटल्या आहेत. त्यामुळे रस्ता खचून मोठे भगदाड पडले आहेत. त्यामुळे एकाबाजूने वाहनांची कशीबशी वाहतूक सुरू असून, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुलाची आणखीनच बिकट अवस्था झाली आहे.

अवजड वाहने व सततच्या वाहतुकीमुळे उर्वरित पूलही खचण्याच्या मार्गावर असून, रात्रीच्या वेळी अंधारात खड्ड्यांचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. परिसरातील आव्हाने बुद्रूक, आव्हाने खुर्द, शहापूर, बर्‍हाणपूर, दिंडेवाडी या गावांसाठी शेवगावला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांची याच मार्गाने ये-जा असते. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन करणार

पूल खचल्याची कल्पना दहा दिवसांपूर्वी देऊनही, संबंधितांनी याची दखल घेतली नाही. अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? पुलाची तातडीने दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपसरपंच शशिकांत काकडे यांनी दिला.

Back to top button