नगर : ‘समृद्धी’प्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला द्या : घनश्याम शेलार यांची मागणी | पुढारी

नगर : ‘समृद्धी’प्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला द्या : घनश्याम शेलार यांची मागणी

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : सूरत-चेन्नई महामार्गासाठी नगर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करताना शेतकर्‍यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला द्यावा, अन्यथा जनआंदोलन उभे करण्याचा इशारा महाविकास आघाडीने दिला, तसेच या वेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नगर तालुका शेतकरी भूमिपुत्र कृती समितीची स्थापना करण्यात आली.

नगर तालुक्यातून जात असणार्‍या सुरत – चेन्नई महामार्गसंदर्भात सांडवा फाट्यावरील समाधान मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा झाला. यावेळी चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, भातोडी, मदडगाव, कोल्हेवाडी, सारोळा बद्धी, शहापूर, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव या भागातील शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार म्हणाले की, समृद्धी महामार्गाचा दर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळून देण्यात येईल. नुकसान भरपाईचे दर जाहीर केल्याशिवाय अधिग्रहण प्रक्रिया पार पाडू नये, अन्यथा शेतकर्‍यांना बरोबर घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

जमिनी नापीक होण्याची भीती

शेतकर्‍यांच्या 7-12 वरील नोंदी. महामार्ग लगत सर्व्हिस रोड, जमिनीमधून हा महामार्ग आडवा तिडवा जात असल्याने जमिनीचे त्रिकोणी षटकोनी तुकडे होत आहेत. त्यामुळे जमिनी नापीक होण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यापासून शिवार वाटा, गाडीवाटा बंद होणार आहेत. त्यामुळे जमिनी पडीक पडण्याची भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. काही शेतकरी यामध्ये भूमीहिन होत आहेत. काही शेतकर्‍यांची यामध्ये घरे, गोठे, विहिरी, शेततलाव, भुसारे, शेड, कोंबडी फार्म जात असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी घाबरून गेले आहेत. या सर्व शेती उपयोगी साधनांची 7-12 वर नोंद घेण्यात यावी.

काही शेतकर्‍यांच्या विहिरी, शेत तलाव, बोअरवेल्स जात असून, विहिरीवर अवलंबून असणार्‍या बागायती जमिनी पडीक पडणार आहेत. त्यामुळे मूल्यांकन करत असताना या उर्वरित पडीक होणार्‍या जमिनींचे ही मूल्यांकन करावे व याबाबत शासन निर्णयात आत्ताच निर्णय घेऊन नुकसान भरपाई द्यावी. यावेळी शरद पवार, प्रकाश पोटे, प्रवीण कोकाटे, आबासाहेब कोकाटे, डॉ. ससे, शरद गुंजाळ, मच्छिंद्र खडके, प्रल्हाद खांदवे, साहेबराव शेडाळे, प्रभाकर आगरकर, भास्कर खडके, जयसिंग काळे, वैभव कोकाटे, दादासाहेब पवार, संतोष कोकाटे, संतोष खराडे, राजेंद्र पवार, यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना योग्य मोबदला न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आम्हाला कुठलीही नोटीस, पूर्वसूचना न देता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे समस्यांचा पाढाच या महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमोर मांडला.

शेतकरी भूमिपुत्र समितीची स्थापना

यावेळी भूमिपुत्र कृती समिती स्थापन करण्यात आली. युवानेते शरद पवार यांची निमंत्रकपदी निवड करण्यात आली. समितीचे 5 सक्रिय सदस्य राहणार आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकर्‍यांना पुढील आंदोलनाविषयी माहिती देऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Back to top button