नगर : कोळगावच्या ग्रामसभेत गदारोळ | पुढारी

नगर : कोळगावच्या ग्रामसभेत गदारोळ

कोळगाव, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत येथे झालेल्या ग्रामसभेत 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावून देशाप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याचा, तसेच कोरोना लसीकरणासाठी बूस्टर डोसचे जनजागृती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सर्वांना जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पेयजल मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा काळे होत्या.

दरम्यान, सभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळण्याआधीच सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला.
ग्रामसभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यात पवार मळ्यात मुरमीकरण, ग्रामीण रुग्णालयासाठी अंदाजपत्रकाची मागणी करणे, झेंडावंदनासाठी शहीद भवन येथे प्रथम ध्वजवंदन करून नंतर नेहमीप्रमाणे इतर ठिकाणी ध्वजारोहण करण्याची मागणी मेजर मिठू शिरसाट यांनी केली. ती सर्वानुमते मान्य करण्यात आली.

आडत व्यापारी कांद्याच्या गोणींचे पैसे देत नसल्याबद्दल मार्केट कमिटीला पत्र लिहिण्याचा ठराव शरद लगड यांनी मांडला. भापकरवाडी, वेठेकरवाडी रस्त्यावरील बाभळी व काटे काढावेत. प्राथमिक शाळा, हायस्कूल, पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामसभेला हजर नसल्याबद्दल जिल्हा परिषदेचेे पत्राद्वारे लक्ष वेधण्याचा निर्णय यावेळी झाला. ग्रामसेवक बेरड यांनी घरकुलालांना जागा उपलब्ध नसल्याचा मुद्दा मांडला. त्यावर माजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी घरकुलांसाठी वैयक्तिक जागा उपलब्ध करून देणार असल्याचे ग्रामसभेत सांगितले.

माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी सध्या आठ-आठ दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्याची मागणी केली, तसेच नागरिकांनीही घरपट्टी भरण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतने गाळे बांधून पूर्ण करावेत. पंचायत समितीच्या माध्यमातून शौचालयांना नळ कनेक्शन अंदाजपत्रक मंजूर करावे. विविध ठिकाणी शुद्ध पाण्यासाठी मंजूर झालेले आरो फिल्टरची कामे पूर्ण करावीत. कोळगावसाठी मंजूर झालेली पाणी योजना लवकर कार्यान्वित करावी. आमदार पाचपुते यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय कामाची निविदा काढावी. गावातील गुन्हेगारीबाबत पोलिसांचे लक्ष वेधण्याचाही निर्णय यावेळी झाला, तसेच पर राज्यातून आलेल्या कामगार, कारागारांचे आधार कार्ड तपासून त्यांच्या नोंदी ठेवण्यात, या विषयी ग्रामपंचायतीला सल्ला देण्यात आला.

वाढत्या अतिक्रमणांना आळा घाला

ग्रामस्थांनी पानंद रस्ते शिवरस्ते यावर भांडण, तंटे अथवा वाद घालू नये, तसेच ज्यांनी ग्रामपंचायत अथवा सरकारी जागेत अतिक्रमण केले. त्या जागेची मोजणी करून तेथे नंबर लावणे अशा विविध मागण्या लगड यांनी केल्या. सर्व प्रश्नांना ग्रामपंचायत सदस्य अमित लगड उत्तर देणार होते. परंतु सभा संपल्याचे जाहीर झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button