नगर : ठाकरे की शिंदे, नगरचे शिवसैनिक संभ्रमात | पुढारी

नगर : ठाकरे की शिंदे, नगरचे शिवसैनिक संभ्रमात

नगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महराज की जय…. उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणांनी मनपा दुमदुमली. बुधवारी शिवसेनेचे काही नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने गुरुवारी महापौर रोहिणी शेंगडे यांच्यासह काही नगरसेवकांनी विशेष बैठक घेतली आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला.

यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, शहर प्रमुख संभाजी कदम, गणेश कवडे, श्याम नळकांडे, संग्राम कोतकर, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, विजय पठारे, प्रशांत गायकवाड, संतोष गेणाप्पा आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काहीजण सोडून गेल्याने संताप व्यक्त केला. तर, आम्ही शिवसैनिक शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत, असा निर्धार व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष गाडे यांनी राजीनामा द्यावा

शिवसेेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घेतलेल्या शिवसेनेच्या मेळावा घेतला होता. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे महापौर रोहिणी शेंडगे यांना म्हणाले, की शिवसेनेशी एकनिष्ठ रहा. त्या शिंदे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) च्या नादी लागू नका. त्या मेळाव्यानंतर काही दिवसांतच जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे व पुत्र शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगीराज गाडे यांनी काल मुंंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आता जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी केली.

संकल्प संवाद यात्रा काढणार

शिवसेनेतील काही नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले असले तरी, मनपातील बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक वार्डात संकल्प संवाद यात्रा आम्ही काढणार आहोत. मागील महिन्याभरापासून उद्धव ठाकरेंबाबत जे काही राज्यात चालू आहे. त्याचा राग व चीड जुन्या, विद्यमान शिवसैनिकांमध्ये आहे. ठाकरे हे नाव बाजूला ठेवून शिवसेना कोणीही चालवू शकत नाही. त्यामुळे लवकरच शहरातील आम्ही नगरसेवक व पदाधिकारी मुंबई जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, असे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.

उद्या भूमिका स्पष्ट करणार

बंधू रमाकांत गाडे व पुत्र नगरसेवक योगीराज गाडे यांनी काही पदाधिकार्‍यांसह काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे, असे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्यासाठी आणखी इच्छुक

काहींनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर काल नगर शहरातील काही शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पहिल्याच भेटी शिंदे यांनी पाच कोटींचा दिला. आता येत्या पंधरा दिवसांत आणखी काही नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार असल्याचे शिंदे गटातील एका नगरसेवकांने सांगितले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून नगर शहरातील शिवसेनेत बंडाच्या हाचलचाली सुरू होत्या. एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत नगरसेवक अनिल शिंदे यांनी गुरूपोर्णिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याच वेळी नगरची शिवसेना फुटणार हे निश्चित मानले जात होते. त्यात नगरसेवक अनिल शिंदे शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्याला उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सुभाष लोंढे, योगीराज गाडे, संग्राम शेळके, अमोल येवले, सचिन जाधव, बसपाचे नगरसेवक अक्षय उणवणे, पदाधिकारी काका शेळके, प्रकाश फुलारी आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पहिल्याच भेटी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, येत्या काही पंधरा दिवसांत नगर शहर शिवसेनेतील आणखी काही पदाधिकारी, शहरप्रमुख, नगरसेवक, माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरातील अनेक पदाधिकारी व नगरसेवकांवर उपकार आहेत. त्यामुळे त्या उपकराची परतफेड कशी कराची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेत, असे त्या नगरसेवकांने सांगितले. मात्र, नगर शहरातील शिवसेनेत फूट पडल्याने सामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे समजते.

नगरमधील शिवसैनिक पदाधिकारी व नगरसेवकांवर गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपकार आहेत हे शिवसैनिकांमध्ये सर्वश्रुत आहेत. शिवसेनेचा एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाला असला तरी काही पदाधिकारी कोसो दूर आहेत. ते उपकारला जागणार का? असा प्रश्न शिंदे गटाकडे गेलेल्या पदाधिकार्‍यांकडून उपस्थित होत आहे.

Back to top button